आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे धरणे आंदोलन
उस्मानाबाद - आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गट प्रवर्तकांना डेटा एंट्रीसाठी प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे पाच दिवसासाठी महा २५० रुपये पीआपपीमध्ये मंजूर केल्याचे दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकाद्वारे आदेशित केले आहे परंतु जिल्ह्यातील गट प्रवर्तकांना सदरील मोबदला दिला जात नाही. अशा सॉफ्टवेअर जरी सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करीत आहेत. त्यामुळे एप्रिल २०२० पासून प्रति महिना २५० रुपये गटप्रवर्तकांना त्वरित देण्यात यावेत, दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या आरोग्य विभागाच्या परिपत्रकानुसार गटप्रवर्तकांचा दैनिक भत्ता प्रति महिना ६२५ रुपये देण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे २०२० पासूनची थकीत रक्कम देण्यात यावी,
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे अतिरिक्त काम गट प्रवर्तकांना सांगितले जाते. त्यामध्ये आशा स्वयंसेविकाकडून अर्ज गोळा करून त्यावर एएनएम, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन सदरील अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम गट प्रवर्तकांना सांगितले जात आहे. या अतिरिक्त कामामुळे गट प्रवर्तकांच्या मूळ कामावर विपरित परिणाम होत असून गट प्रवर्तकांच्या जॉब चार्टमध्ये येत नाही. त्यामुळे गट प्रवर्तकांना त्यांचे मूळ काम प्रभावीपणे व सुरळीतपणे करता यावे यासाठी या योजनेचे अतिरिक्त काम गटप्रवर्तककडून अपेक्षित नसून ते त्यांना सांगण्यात येऊ नये, आरोग्य वर्धिनीमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश केलेला नसताना देखील रिपोर्टिंग करण्याचे काम त्यांना सांगण्यात येत आहे. यासाठी पगारावर कर्मचारी असून त्यांना आरोग्य वर्धिनी अंतर्गत पगार १५०० रुपये मिळतो. तसे गटप्रवर्तकांना या कामाचा मोबदला देण्यात यावा, प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिंगसाठी दरमहा दीड हजार रुपये मोबदला गटप्रवर्तक यांना देण्यात यावा,स्टेशनरी साठी तीन हजार रुपये प्रति वर्ष रक्कम गटप्रवर्तक यांचे बँक खात्यात जमा करण्यात यावी.
सर्व आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना नोव्हेंबर महिन्यापासून चे केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे मानधन देण्यात आलेले नाही ते त्वरित देण्यात यावे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आशा सेविका व गटप्रवर्तक यांना २५ जून २०२० रोजी संबोधित करताना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींना मासिक २ व ३ हजार रुपये निश्चिती व कायम स्वरूपी वाढ जाहीर केली ती लागू करण्यात यावी, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचा प्रतिदिनी एकशे पन्नास रुपये भत्ता देण्यात यावा, कोविड- १९ लसीकरण सत्रात केंद्राप्रमाणे राज्य शासनाकडून देखील दोनशे रुपये मोबदला देण्यात यावा,
आशा व गटप्रवर्तक यांना दर महिन्याच्या सात तारखेच्या पूर्वी मोबदला देण्यात यावा, ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट घेऊन थांबविण्याचे काम सांगण्यात आले होते. त्याचा मोबदला ३०० रुपये देण्यात यावा, क्षयरोग व कुष्ठरोग रूग्ण शोधण्याच्या सर्वेसाठी आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक स्वतः घेण्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठीचे मानधन देण्यात यावे यासह इतर तीस मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या जिल्हाध्यक्ष प्रभावती गायकवाड, जिल्हा संघटक सुरेखा ठाकूर, नवनाथ धुमाळ यांच्यासह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.