बापरे !  नळदुर्गच्या बंधाऱ्यात मगर दिसली !!

शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे वन अधिकाऱ्यांचे आवाहन 
 
बापरे !  नळदुर्गच्या बंधाऱ्यात मगर दिसली !!

नळदुर्ग - आलियाबाद शिवारातील बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या पात्रात पाच फूट लांबीची मगर आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. तुळजापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मगरीबाबत दुजोरा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात नळदुर्ग परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर हा बंधारा तुडुंब भरला आहे. त्याचवळी ही मगर आली असावी, असा अंदाज आहे. नळदुर्गमध्ये प्रथमच मगर आली असून परिसरातील शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. 

शहराजवळून वाहणारी बोरी नदीवर रामतीर्थ शिवारात या भागात सिंचनासाठी बोरी नदीचा प्रवाह अडवून उच्च पातळी बंधारा बांधण्यात आला आहे. बंधाऱ्याला दोन वर्षांपूर्वीच स्वचंलित गेट बसवून पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे बोरी नदीच्या पात्रात पूर्वीपासूनच मगर असण्याची शक्यता धुसर आहे. पावसाळ्यात १४ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्याने बोरी नदीला महापूर आला होता. या पाण्यात बोरी धरणावरील भागातून हा मगर पाण्याचा जोरदार प्रवाहात येथे येऊन बांधाऱ्यात अडकला असण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील नदीमधील मगर आढळल्याची पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. 

आलियाबाद पुलाजवलीळ स्मशानभूमीच्या दक्षिण बाजूस काठावरील पाण्यात सर्वप्रथम बुधवारी या भागातील शेतकऱ्यांना मगर दिसली. त्यामुळे शेतकरी, गुराखी, मासेमारी करणाऱ्यांमध्ये भीती पसरली. तुळजापूर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देवून उच्चपातळी बंधारा ते आलियाबाद पुलातील पाण्याचे निरीक्षण केले. त्यांना अंदाजे पाच ते सहा फूट लांबीची मगर दिसली. खबरदारीसाठी वनविभागाने शेतकरी, जनावरांना पाणी पाजणाऱ्या गुराख्यांना बोरी नदीच्या काठापासुन दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोहणे, मासेमारीसाठी प्रतिबंध केला. मगरीला इतरत्र हलविण्यापर्यंत या ठिकाणी प्रतिबंधचा बोर्ड लावणार आहे. या ठिकाणी दोन वनमजूर कर्मचाऱ्यांचा पहारा लावला आहे. मगरीचे काही दिवस निरीक्षण करून तिला पकडून येथून हलवून इतरत्र ठिकाणी सोडण्यात येणार आहे. मगर सध्या आक्रमक नाही तरी पाण्यापासून शेतकरी, जनावरे लांब ठेवण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
 

मगर पकडण्यासाठी कसरत होणार
बोरी नदी किल्ल्याला वळसा घालून दक्षिणेस वाहते. उच्च पातळी बांधाऱ्याचे पाणी आलियाबाद पूल ते पुढील बाजूस किल्ल्याचा मागील असलेल्या मछली तटापर्यंत तुंबलेले असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आहे. उच्च पातळी बंधारा ते मछली तटापर्यंच्या पात्रात मगरीचा शोध घेण्यास मोठी कसरत करावी लागणार आहे. काही अघटित घटना घडू नये, यासाठी उच्च पातळी बंधारा ते सम्शानभूमी, आलियाबाद पूल व मछली तटापर्यंत नदीवरील शेतकरी, पशुपालक, मासेमारी करणाऱ्या लोकांना मगरीपासून धोका होऊ शकतो.त्यामुळे या भागातील लोकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.

तुळजापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यानी  प्रत्यक्ष  पाहणी करून, याठिकाणी वन विभागाचे दोन कर्मचारी तैनात केले आहेत. या नदी पात्रात शेतकऱ्यांनी जनावरे चरण्यासाठी जावू नये किंवा जनावरांना बंधाऱ्यात पाणी पाजू नये , असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी  केलं आहे. या ठिकाणी लवकरच माहिती दर्शवणारा फलक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

.............................

निरीक्षण करणार

वन विभागाच्या पाहणीत नळदुर्ग उच्चपातळी बांधाऱ्यात मगर दिसून आली आहे. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा मगर सहजासहजी काठावर येणार नाही. यमगरीच्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवून आहाेत. काही दिवस निरीक्षण करून मगरीसाठी रेस्क्यू ऑपरेशनसारखी कायर्वाही होऊ शकते. या भागातील शेतकरी, गुराखे यांनी तट व पाण्यापासून दूर राहावे.
- राहुल शिंदे, वनपाल, तुळजापूर वन विभाग.

From around the web