शहापूर परिसरात वीज खंडीत केल्याने पिके होरपळून जाण्याच्या मार्गावर

 
शहापूर परिसरात वीज खंडीत केल्याने पिके होरपळून जाण्याच्या मार्गावर

नळदुर्ग - वीज  बिल भरणा करा अन्यथा जोडणी खंडीत करण्यात येईल,  हा मोहम्मद तुघलकी आदेश काढून अनेक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने पिके ऐन  उन्हाळ्यात होरपळून जात आहेत.  

मागील वर्षात लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आली होती. मायबाप सरकार वीज बिल माफ करेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बिल भरले नव्हते, पण आता ऐन  उन्हाळ्यात वीज खंडीत  केली जात आहे. त्यामुळे उन्हाळी भुईमूग,ऊस इत्यादी उभी पिके होरपळून जात आहेत. त्याचबरोबर मुक्या प्राण्याचे पाण्याविना हाल होत आहेत. 

वीज पुरवठा खंडीत  केला जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. काही प्रमाणात शेतकरी वीज  बिल भरणा करत असून मागील तीन दिवसांत साधारण दोन ते तीन लाखांपर्यंत भरणा झाला आहे.

वेळोवेळी सरसकट वीज पुरवठा  सुरू करण्याची मागणी करुन देखील महावितरण विभाग सुस्त असून  मस्त वसुली चालवली आहे.शहापूर चे विद्यमान सरपंच  उमेश गोरे,उपसरपंच  बाळासाहेब काळे यांनी शेतकरी नागरिक यांच्या वतीने महावितरण अधिकारी तुळजापूर यांच्या बरोबर चर्चा करून वीज पुरवठा दिलेल्या वेळेत पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.

मागील वर्षभरात मीटर  रिडींग न घेता वीज बिले देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज बिल भरूनही वीज वारंवार खंडीत  केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप तसेच मोटारी नादुरुस्त होत आहेत. 

From around the web