नळदुर्ग येथे कोविड केअर सेंटर सुरु

नळदुर्ग शहरासह परिसरातील रुग्णांची सोय 
 
नळदुर्ग येथे कोविड केअर सेंटर सुरु

नळदुर्ग  - येथील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात आजपासून कोव्हीड केअर सेंटरची सुरुवात झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या या कोव्हीड केअर सेंटरमुळे नळदुर्ग शहरासह परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे.


नळदुर्ग शहर व परिसरात देखील कोवीड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून येथील नागरिकांना उपचारासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात यावे लागत होते.  ही गरज लक्षात घेऊन नळदुर्ग येथे कोवीड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तहसीलदार तुळजापूर यांना दिल्या होत्या. बुधवारीच सदरील कोवीड सेंटर सुरू होणे अपेक्षित होते परंतु नर्स उपलब्ध न झाल्याने दोन दिवस उशीर झाला. 

 नळदुर्ग व परिसरातील गावांच्या नागरिकांसाठी तेथे कोविड केयर सेंटर उभारणे आवश्यक असल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नळदुर्ग ला भेट दिली होती. तसेच येथील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.आंबेडकर वस्तीगृहामध्ये सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी दोन दिवसात ८० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 

दिलेल्या मुदतीत कोव्हीड केअर सेंटर सुरु होत नसल्याचे निदर्शनास येताच आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी तुळजापूरचे तहसिलदार श्री.सौदागर तांदळे, श्री.भिवाजी इंगोले, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांना  नळदुर्ग येथे भेट देऊन आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. याअनुषंगाने त्यांनी आढावा घेतला असता, डॉक्टर्स, औषधे व रुग्णवाहिका उपलब्ध असून केवळ नर्सिंग स्टाफ उपलब्ध होत नसल्याने कळविले होते. यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दोन दिवसात नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्याचे सूचित केले होते, व त्याप्रमाणे त्यांनी स्टाफही उपलब्ध करून दिला.आज या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून ७ रुग्ण येथे उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहेत. 

याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.रेणुका इंगोले, तहसीलदार श्री.सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्री.प्रशांत सिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य कल्याण समिती सदस्य श्री.आनंद कंदले, नगरसेवक श्री.बसवराज धरणे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, भिवाजी इंगोले, दयानंद मुडके तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रुग्णांवर गावातच उपचार व्हावेत या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावातील ग्रामस्थांनी कोवीड केअर सेंटर सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर मागणी देखील केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले असून  आयसोलेशन सेंटर साठी परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदार यांना दिले आहेत. या रुग्णांवर शासनामार्फत गावातच वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या गावात रुग्णांची संख्या जास्त आहे तेथील ग्रामस्थांनी आयसोलेशन सेंटर सुरू करावेत, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच ज्यांना कोवीड केयर सेंटर सुरू करायचे आहेत त्यांच्यासाठी देखील नियमावली निर्गमित करण्यात आली आहे.

From around the web