उस्मानाबाद जिल्ह्यात कोव्हॅक्सीन लस अखेर उपलब्ध 

१८ ला कोविशिल्डचा पहिला तर १९ ला कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोव्हॅक्सीन लस अखेर उपलब्ध

उस्मानाबाद  -  कोरोना विषाणूंची बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याची थंडावलेली मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ४५ वर्षा पुढील नागरिकांना दि.१८ मे रोजी कोविशील्डचा पहिला तर दि.१९ मे रोजी कोव्हेक्सीनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दि.१८ मे रोजी ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११ निवडक आरोग्य उपकेंद्र, २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद तसेच पोलीस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी सदरील लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तर दि.१९ मे रोजी कोव्हॅक्सीन लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्यांनी पूर्वी या लसीचा डोस घेतला आहे व २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना हा डोस देण्यात येणार आहे.

 लाभार्थ्यांना लसीकरणासाठी आधार कार्ड किंवा पूर्वी नोंदविलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे या दिवशी फक्त दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जावे इतरांनी या केंद्रावर जाऊन गर्दी करु नये. यासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर, उस्मानाबाद, पोलीस रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय उमरगा व उपजिल्हा रुग्णालय परंडा या ९ केंद्रावर सदरील लस सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत देण्यात येणार आहे.

तसेच दि. १८ मे रोजी कोविशील्ड लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी किंवा बुकिंगची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉर्ट नोंदणी पद्धती प्रमाणे लसीकरण केले जाणार असून लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी केंद्रावरील उपलब्ध लसीच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार असून लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करणे आवश्यक आहे. 

तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी देखील गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.के. पाटील व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web