निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 

निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 
 
d

धाराशिव  - धाराशिव नगर पालिकेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्यावर आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत. सहाव्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांची सध्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी  यलगट्टे  यांनी दाखल केलेला जामीन  अर्ज जिल्हा  न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे  यलगट्टे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. 

निलंबित  तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे  धाराशिवमध्ये कार्यरत असताना, त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला.अनियमित बांधकाम परवाना देणे, बेकायदा  गुंठेवारी प्लॉटिंगला लेआऊट मंजूर करणे,भंगार  विकणे, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणे, कंत्राटदारांना कामाचे बोगस  चेक देणे, विविध बँकेत अनेक खाते उघडणे  आदी प्रकरणात ते अडकले. त्यांच्या काळातील अनेक फाईल्स सध्या गायब आहेत. हरीकल्याण येलगट्टे  यांच्याबरोबर पालिकेचे दहा  कर्मचारी अडकले असून, तेही निलंबित आहेत. धाराशिव पालिकेतील कथित भ्रष्ट्राचार धाराशिव लाइव्हने चव्हाट्यावर आणला आहे. 


निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे  यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण सात गुन्हे दाखल  आहेत. पाचव्या गुन्ह्यात १२ दिवस पोलीस कस्टडी आणि १४ दिवस दिवस जेल झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर पुन्हा आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नवीन गुन्हा दाखल  झाल्यानंतर निलंबित तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना  पोलिसांनी पुण्यात अटक केली होती. मागील १४ दिसवापासून यलगट्टे जेलची हवा खात आहेत. 

काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद उस्मानाबाद येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या  अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उस्मानाबाद हा. मु. रा. समर्थ नगर उस्मानाबाद यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सातवा गुन्हा दाखल 

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

खरे सूत्रधार बाहेर 

धाराशिव नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून हरीकल्याण यलगट्टे कार्यरत असताना, ते पालिकेचा कारभार हाकणाऱ्या एका नेत्याच्या हातचे बाहुले झाले होते. त्या नेत्याचा एक नातेवाईक पालिकेत नगर अभियंता   पदावर कार्यरत होता, त्याने यलगट्टे  यांच्या सह्या घेऊन लाखो रुपयाचा अपहार केला. या राजकीय नेत्याने अनेक बोगस बिले काढून येलगट्टे यांना गोत्यात आणले आहे. हरीकल्याण यलगट्टे यांनी तोंड उघडल्यास खरे सूत्रधार या प्रकरणी सापडू शकतात, पोलीस एकास टार्गेट न करता, खरे सूत्रधार शोधणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.  

From around the web