कोरोना लस सुरक्षित, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी
उस्मानाबाद :- मी स्वत: कोरोनाची लस घेतली असून कोरोना लस ही अतिशय सुरक्षित आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, त्यामूळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो सोलापूर, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोविड 19 लसीकरण व आत्मनिर्भर भारत या विषयावरील जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या मल्टीमिडिया मोबाईल व्हॅन प्रदर्शन मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी मोबाईल व्हॅनला जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही वडगावे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे आदि उपस्थित होते.
राज्यात सर्वत्र कोरोनाच्या नवीन रुग्णामध्ये पुन्हा वाढ होत आहे. जिल्हयामध्ये उरुस, यात्रा व सार्वजनिक ठिकाणी लोक मोठया प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर कोरोनावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. विनामास्क आढळून आल्यास प्रथम 500 रुपयांचा दंड करण्यात येईल. पुन्हा तीच व्यक्ती आढळल्यास 1000 रुपये दंड व आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.
डॉ. फड म्हणाले, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत नागरिकांनी भारतात तयार झालेल्या वस्तूच खरेदी करुन योजनेत योगदान द्यावे. कोविड 19 आजारावर माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेली मल्टी मिडिया मोबाईल व्हॅन जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये जनजागृती करणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतीश घोडके यांनी केले. या मोबाईल व्हॅन मार्फत दिनांक 18 ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्हा व तालुका मुख्यालयात व ग्रामीण भागातील मुख्य मार्ग, बाजारपेठा, बस स्थानके, महत्वाचे चौक परिसरात जनजागृती करण्यात येणार आहे. याचबरोबर व्हॅन सोबत निर्मिती लोकनाटय कलापथक व ईश्वर प्रभु कला मंच, उस्मानाबाद हे लोक कलेच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.