कोरोना मुक्तीसाठी तपासण्या करून घेणे आवश्यक- डॉ. विजयकुमार फड
उस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार नियंत्रित करण्यासाठी कोरोना अनुषंगाने तपासण्या वाढवणे, तपासण्या करून घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी म्हटले आहे.
गावोगावी दिलेल्या भेटीमध्ये फड यांनी गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना तपासणी करून घेण्याबाबत आवाहन व मार्गदर्शन केले. फड यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे, डॉ.कुलदीप मिटकरी,मेघराज पवार,डॉ. किरण गरड, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने तसेच ग्रामसेवक, सरपंच इत्यादी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी त्यावर नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रूग्णसंख्या कमी न होता, झपाट्याने वाढत आहे. कारण नागरिक आजार व आजाराची लक्षणे लपवून कोरोना तपासणी करून घेण्याचे टाळत आहेत. वेळीच तपासणी केली तर निश्चितच रुग्णाला फायदा होणार आहे. कोरोना पॉझिटिव असलेल्या रुग्णामुळे इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही. काळाची ही गरज व प्रत्येकाच्या जीवाचे महत्त्व विचारात घेऊन नागरिकांनी स्वतःहून कोरोना तपासणीसाठी पुढाकार घ्यावा.कोणत्याही गावात कोरोना तपासणीसाठी पथक पाठवण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. ग्रामसेवक, सरपंच, नागरिक यांनी गावात लोकांच्या तपासणीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ग्राम पातळीवर शासनाची जेवढी स्थानिक यंत्रणा आहे, त्या यंत्रणेने आणि सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन तपासणीस प्रतिसाद द्यावा. तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर निश्चितच कोरोना नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होईल, असेही श्री. फड म्हणाले.