कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्हयात निर्बध लागू
उस्मानाबाद - राज्यातील कोविड-19 च्या साथीचा प्रादुर्भावमध्ये वाढ होऊ नये म्हणून राज्य शासनाने 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी निर्बध जारी केले आहेत.त्याच अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज आदेश जारी करून जिल्हयातही हे निर्बध लागू केले आहेत.त्यामुळे आता जिल्हयात सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास किंवा जमा होण्याचे मनाई आदेश लागू झाले आहेत.तसेच रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यासही मनाई असणार आहे.विवाह कार्यक्रमास केवळ 50 तर अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल.सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रम आणि मेळाव्यास 50 लोकांच्या मर्यादेत उपस्थित राहता येईल,तर सर्व शाळा,विद्यालये,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस येत्या 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद असतील.
शासकीय कार्यालयातील उपस्थिती :- कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालयप्रमुखांचे लेखी परवानगीशिवाय कार्यायालयात प्रवेशास मनाई असेल. कार्यालयप्रमुखांनी नागरिकांशी व्ही.सी. द्वारे ऑनलाईन संवादाची व्यवस्था कार्यान्वित करावी. शासकीय बैठकांकरिता एकाच कार्यालय परिसराच्या अथवा मुख्यालयाच्या बाहेरील उपस्थितांकरिता ऑनलाईन व्ही.सी. सुविधेचा वापर करण्यात यावा. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना घरुनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि कार्यालयप्रमुखांच्या आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामकाजाच्या वेळा यामधील पुरेसे अंतर याबाबत सुयोग्य सुसूत्रीकरण करावे. याकरिता कार्यालयप्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत लवचिकता ठेवण्यास मुभा राहील. सर्व शासकीय कार्यालयांध्ये कोविड अनुरुप पद्धती (CAB) चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधितविभागप्रमुख/कार्यालयप्रमुख यांनी करावी. सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.
खाजगी कार्यालयातील उपस्थिती :- कार्यालय व्यवस्थापनाने घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि कामाच्या तासांमधील पुरेसे अंतर याबाबत सुयोग्य सुसूत्रीकरण करावे. कार्यालयामध्ये नियमित उपस्थितांची मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त नसावी. तसेच याकरिता व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये लवचिकता ठेवणे, कार्यालये 24 तास आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये (शिफ्ट्स) चालू ठेवावे. तथापि,याप्रकारे निर्णय घेताना व्यवस्थापनाने महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोय या बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात.
कार्यालयाने कामकाजाच्या वेगवेगळ्या वेळा व कामाचे विषम तास निश्चित केले असतील अशा बाबतीत कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सादर केल्यास त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाकरिता करण्यात येणारा प्रवास हा अत्यावश्यक हालचालीमध्ये समजण्यात येईल. कोविड-19 लसीकरणांचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच केवळ कार्यालयात प्रत्यक्ष प्रवेशाची मुभा राहील. तथापि, ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हावयाचे आहे त्यांना संपूर्ण लसीकरण घेण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. कार्यालयांध्ये कोविड अनुरुप पद्धती (CAB) चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापनप्रमुख यांनी करावी. सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.
विवाह कार्यक्रम :- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.
अंत्यविधी :- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून कमाल एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.
सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम,मेळावे :- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.
शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस :- अपवाद वगळता सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत बंद असतील; विविध शैक्षणिक मंडळांचे इयत्ता दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांकरिता आवश्यक असलेले उपक्रम. प्रशासकीय कामकाज आणि वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त शिक्षकांनी नियमितपणे करावयाचे कामकाज (ऑनलाईन अध्यापन व इतर). शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, तंत्र व उच्चशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास विभाग अथवा इतर कोणत्याही वैधानिक प्राधिकरणाने विशेषकरुन निर्देशित केलेल्या अथवा परवानगी दिलेल्या बाबी. या विभागांस अथवा वैधानिक प्राधिकरणास अधिकच्या अपवादांची आवश्यकता असल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचेकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.
जलतरण तलाव, स्पा, वेलनेस सेंटर्स :- पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
व्यायामशाळा:- या ठिकाणी कोणतीही कृती करताना नाक व तोंडावर मास्क घालण्याच्या अटीवर ही ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवांचा लाभ घेता येईल. व्यायामशाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झाले असणे आवश्यक राहील.
सलून,केशकर्तनालये,ब्युटीपार्लर :- या ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत सदर दुकाने बंद राहतील. दुकांनामध्ये केसकर्तनाशिवाय इतर सर्व प्रकारच्या कार्यांना मनाई असेल. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
ब्युटीपार्लरमधील ज्या क्रिया-सेवांमध्ये कोणासही नाक आणि तोंडावरील मास्क काढण्याची आवश्यकता असणार नाही केवळ अशाच क्रिया-सेवांना परवानगी राहील . केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवांचा लाभ घेता येईल. तसेच ब्युटीपार्लरमधील सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झाले असणे आवश्यक राहील. तथापि, वरिल ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.
क्रीडा स्पर्धा इत्यादी:- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वनियोजित स्पर्धांना खालील अटी व शर्तींनुसार परवानगी असेल. प्रेक्षकांना परवानगी नसेल. सर्व खेळाडू/स्टाफ करिता बायो-बबल असेल. सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंना
भारत सरकारचे सर्व निर्देश/नियम लागू असतील. सर्व खेळाडू आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येक तीन दिवसाने आरटीपीसीआर/रॅट चाचणी करणे बंधनकारक असेल. गाव,शहर,तालुका,जिल्हा स्तरावरील कोणत्याही स्वरुपाचे क्रीडा स्पर्धांना पूर्णत: मनाई असेल.
मनोरंजनाची स्थळे जसे की उद्याने, प्राणीसंग्रहालये, संग्रहालये, बाग-बगीचे/पार्कस्, किल्ले, स्थानिक पर्यटन स्थळे इत्यादी :- पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
शॉपींग मॉल्स, बाजार संकुले :- या ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि ,या मॉल्सची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्प्ष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे. व्यवस्थापनाने ग्राहक व अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कोविड अनुरुप वर्तन,निर्देश,नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का यावर करडी नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या ठिकाणी कोविड-19 रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) करिता बुथ/किऑस्क उपलब्ध ठेवण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर दुकाने बंद असतील.
रेस्टॉरेन्ट, उपहारगृह :- या ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि,या रेस्टॉरेन्ट, उपहारगृहाची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्प्ष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावा. कोविड अनुरुप वर्तन,निर्देश,नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावेत. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रेस्टॉरंट,उपहारगृह व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर आस्थापना बंद असतील. पार्सल सुविधा,होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.
नाट्यगृह/चित्रपटगृहे :- या ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि,या नाटयगृह व चित्रपटगृहाची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्प्ष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे. कोविड अनुरुप वर्तन,निर्देश,नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या
नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नाट्यगृह/चित्रपटगृह व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर आस्थापना बंद असतील.
आंतरराष्ट्रीय प्रवास :- केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियम लागू राहतील.
देशांतर्गत प्रवास :- महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वा प्रवासाचे 72 तासादरम्याचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे. सदर बाब देशांतर्गत हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतुकीला लागू असेल. देशांतर्गत प्रवास करणारे वाहनचालक/क्लीनर्स/इतर स्टाफ यांनाही वरिल बाबी लागू राहतील.
कार्गो सेवा-वाहतूक, औद्योगिक बाबी, बांधकाम कार्ये :- दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता सुरु असतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था : दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता नियमित वेळेनुसार सुरु असतील.
केंद्रीय लोकसेवा आयोग,राज्य लोकसेवा आयोग,वैधानिक संस्था,सार्वजनिक संस्था इ. कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा : राष्ट्रीय पातळीवरुन आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांकरिता केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या परीक्षांचे प्रवेशपत्र हे अत्यावश्यक बाबीअंतर्गतच्या हालचालीकरिता वैध पुरावा समजण्यात येईल.
राज्य पातळीवरुन आयोजित होणाऱ्या परीक्षांसंदर्भात ज्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत आणि परीक्षेची तारीख अगोदरच जाहीर करण्यात आली आहे अशा परीक्षा नियोजनाप्रमाणे घेता येईल. तथापि, इतर सर्व परीक्षांकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. सर्व परीक्षेदरम्यान कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे.
जमावबंदी व संचारबंदी अंतर्गत अत्यावश्यक हालचालींकरिता वैध असलेल्या बाबी :- वैद्यकीय आपातकालीन सेवा, अत्यावश्यक सेवा (सदर आदेशासह संलग्नित परिशिष्ट-1 नमूद अत्यावश्यक सेवा) प्रवासाकरिता वैध तिकांटासह विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इत्यादी ठिकाणांकडे जाणे अथवा तेथून परत येणे. जे कार्यायले 24 तास वेगवेगळ्या सत्रांमध्ये सुरु असतील अशा कार्यालयांचे कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठीची हालचाल.
मॉल्स, दुकाने, रेस्टारेन्ट, उपहारगृहे, हॉटेल, ई-कॉमर्स सेवा, होम-डिलीव्हीरी,पार्सल सेवा शी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण असणे गरजेचे आहे. तथापि, या नियमाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा संबंधित दुकाने,सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येऊन या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येईल. या दुकाने,सेवा संबंधित ठिकाणी वेळोवेळी कोविड-19 रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात यावे . जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जिल्ह्यातील कोविड-19 साथरोग व्यवस्थापनाकरिता शासकीय-निमशासकीय कार्यालये/संस्था मधील मनुष्यबळ, संसाधनाचे अधिग्रहण करता येईल.
या आदेशात नमूद नसलेल्या इतर बाबींकरिता यापूर्वी लागू असलेले तरतुदी अंमलात असतील. हे आदेश उस्मानाबाद जिल्हा सीमा क्षेत्रात दिनांक 10 जानेवारीच्या मध्यरात्री 00.00 ते पुढील आदेशापर्यंत लागू असेल. असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील,असेही या आदेशात नमूद केले आहे.