कोरोना : सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अंगावर काढणे धोकादायक 

 
कोरोना : सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अंगावर काढणे धोकादायक

उस्मानाबाद  - जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून अशा कालावधीत नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर काढणे हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी,  घशात खवखव करणे, मळमळ होणे अशा प्रकारचे कोणतेही लक्षण असेल तर अशा नागरिकांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा , असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  विजयकुमार फड यांनी आज केले आहे.

 जिल्हा प्रशासन जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांना लस देण्यासाठी आरोग्य केंद्रासोबत उपकेंद्रातही व्यवस्था केली जात आहेत. गावोगावी ग्रामपंचायत स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व नियुक्त अधिकारी-कर्मचारी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ती जबाबदारी पार पाडत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ स्तरावरील लोकप्रतिनिधीही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. तरीहीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामागचे कारण म्हणजे काही नागरिक आजार अंगावर  लपवून ठेवत आहेत . 

काही दिवस कोरोना अंगावर काढतयानंतर  सहन  करण्याच्या पलीकडे आजर गेल्यानंतर आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणत आहेत. त्यामुळे अशी अति गंभीर  रुग्ण होऊन त्यांच्यावर अडचणींना तोंड देण्याची वेळ येत आहे. कसल्याही प्रकारचा आजार, लक्षणे जाणवताच किमान सद्यपरिस्थितीत तरी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करणे अत्यंत आवश्यक आहे. एका विशिष्ट टप्प्यानंतर कोरोना रुग्णास मदत करणे  आरोग्य विभागासही कठीण जाते. त्यामुळे स्वतःचा आणि स्वतःबरोबर इतरांचा योग्य प्रकारे तसेच वेळीच उपचार करता येण्यासाठी आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ आरोग्य विभागाची संपर्क साधने आवश्यक आहे , असे आवाहन करून डॉ. फड यांनी खरे म्हणजे ही प्रत्येकाची कर्तव्य व नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिक ही जबाबदारी पार पाडू लागला तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळू  शकेल. 

सहा फुटाचे भौतिक अंतर राखणे ,  चांगल्या गुणवतेचा मास्क वापरणे , स्वच्छता बाळगणे आदी  बाबी कोरोना  प्रतिबंधाच्या आधारस्तंभ आहेत. यांचे सर्वांनी  पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते  म्हणाले.  डॉ .फड यांनी सांजा, सारोळा, समुद्रवाणी, वडगाव सिध्देश्वर, केशेगाव आदी गावांना आज भेटी दिल्या आणि या  भेटीत उपस्थित नागरिकांशी चर्चा  करून सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. डॉ . फड यांच्यासोबत यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस एस. पांचाळ, जिल्हा लासीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, सम्बधित गावचे  सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

From around the web