थकीत देयकासाठी कंत्राटदारांचे उपोषण आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच

 
s

धाराशिव - सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाची देयके तत्काळ द्यावीत या मागणीसाठी उस्मानाबाद कंत्राटदार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.17 जुलै रोजी धडक मोर्चा काढून साखळी उपोषण सुरु करण्यात आलेले  आहे. मंगळवारी (दि.18) दुसर्‍या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेनेचे नगर परिषद माजी गटनेते सोमनाथ गुरव व इतर पदाधिकार्‍यांनी पाठींबा दिला आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे केलेली आहेत. ती कामे करताना विविध बँकेकडून व खाजगी लोकांकडून कामासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे व मशीन खरेदीसाठी कर्ज घेतलेली आहेत. त्या कर्जाला साधारणतः 1 टक्का दर महिना व्याज द्यावे लागते. परंतू त्यांची देयके 31 मार्च 2023 पर्यंत मिळतील असे गृहीत धरून बँक व खाजगी लोकांनी कर्ज दिले. मात्र घेतलेले कर्ज परतफेड न झाल्यामुळे बँक व खाजगी व्यक्ती वसुलीचा तगादा लावत आहेत. परिणामी काहीजणांचे बँकेतील खाते एनपीएमध्ये जाण्याची शक्यता असून गहाण ठेवलेल्या मालमत्तेवरील जप्तीच्या नोटिसा बँकेकडून काढण्याची शक्यता आहे. काम करण्यासाठी लागणार्‍या मशिनरी उदा. टिप्पर, रोलर, पेव्हर, व्हॉट मिक्सर प्लॅन्ट, काँक्रीट मिक्सर व इतर साधने बँकेच्या कर्जावर घेतलेल्या असून त्यांचा बँकेला महिन्याला हप्ता भरावा लागतो. देयके वेळेवर न मिळाल्यामुळे बँकेचे हप्ते थकलेले असून मशिनरी जप्ती होण्याची वेळ आलेली आहे. तर मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात 5054 (04) या शीर्षाखाली 74 कोटी व 5054 (03) या शीर्षाखाली 76 कोटी असे दोन्ही मिळून जवळपास 150 कोटी रकमेची देयके मार्च 31 अखेर शासनाकडे थकीत आहेत. त्यासाठी 28 जूनमध्ये 6.87 कोटी (9 टक्के) व 13.15 कोटी (20 टक्के) असे एकूण 20 कोटी प्राप्त झाले. तर एप्रिल, मे व जून या कालावधीत करण्यात आलेल्या कामामुळे सद्यस्थितीत राज्यमार्ग 5050 (3) या शीर्षाखाली 90 कोटी व प्रमुख जिल्हा मार्ग 5054 (04) या शीर्षाखाली 95 कोटी असे एकूण 185  कोटी रुपयांची व 3054 योजनेत तर या शीर्षाखाली सद्यस्थितीत 105 कोटींची देयके येणे बाकी आहेत. असे एकूण 290 कोटी देयके शासनास सादर केलेले आहेत.  सदरील देयके देण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

संघटनेचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्यक्ष डी.जे. शिंदे, सचिव के.डी. घोडके, कोषाध्यक्ष ए.जी. गरड, सुभाष देशमुख, शिवेंद्र कंट्रक्शन धाराशिव, सखाराम डोके - पाटील, धैर्यशील पाटील, विशाल रघोजी, झेड.ओ. मणियार, एस.व्ही. भोईटे अँड कंपनी, मे. सिद्धेश्वर कंट्रक्शन कंपनी,  अमोल गरड, वैभव गपाट, आर.एम. कदम, सुनील मुंडे, गुलचंद व्यवहारे, केदारनाथ इंगळे, राबत सय्यद, रमीज तांबोळी, सुनील चव्हाण, किरण वाघमारे, विकास मोळवणे, संजय जेवळीकर, आर.जी. सोपान,  प्रभू काळे, एस.बी. वाघे, अजय भोसले, अक्षय माने, संदीप ठोंबरे आदींसह इतर ठेकेदार आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

From around the web