सर्व सहमती आणि माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करुन उस्मानाबादच्या विद्यापीठाचा विचार करु

  - उदय सामंत
 
s

उस्मानाबाद -केंद्र शासनाच्या नवीन उच्च शिक्षण विषयक धोरणाचा अभ्यास करुन राज्यातील त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालाचा अभ्यास करुन तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन,मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या येथील उप परिसराचे रुपांतर विद्यापीठात करण्याचा सर्व सहमंतीने विचार केला जाईल,असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केले.

विद्यापीठाच्या येथील उप परिसरातील सभागृहात श्री.सामंत यांनी आज बैठक घेऊन येथील कामकाज समजून घेऊन आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ,आमदार कैलास पाटील,उच्च शिक्षणचे सहसंचालक आर.के.निंबाळकर,तंत्रशिक्षणचे सहसंचालक एम.डी.शिवनकर,विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य सर्वश्री संजय निंबाळकर,गोविद माळे,प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख,नगरध्यक्ष मकरंद राजे-निंबाळकर,विद्यापीठाच्या उपपरिसराचे संचालक डॉ.डी.के.गायकवाड आदी उपस्थित होते.

  विद्यापीठाच्या येथील उपपरिसराचे रुपांतर विद्यापीठात करण्यासंदर्भात निवेदन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि उपस्थित सर्व पक्षीय शिष्टमंडळाने मंत्री श्री.सामंत यांना दिले असता त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी येथील विद्यापीठ उपपरिसरात सुमारे 40 कोटी रुपयांची कामे विद्यापीठाच्या स्व-निधीतून करण्यात आली आहेत. या जिल्ह्यात 84 महाविद्यालय आहेत.

उमरग्यापासून औरंगाबादचे अंतर 350 किमीचे आहे. या परिसराचे 100 मुलींचे वसतीगृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. आता या परिसरात ग्रंथालयासाठी स्वतंत्र इमारत, मुलांचे वसतीगृह, विश्रामगृह, कॅन्टीन आणि इतर कामे सुरु आहेत. त्यासाठीही विद्यापीठाने निधी दिला आहे. सध्या या विद्यापीठाच्या क्षेत्रात 550 कॉलेज आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खूप वाढला आहे. उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद लांब पडते. तेंव्हा केवळ 15-20 कोटी रुपये आणखी खर्च केल्यास येथील उपपरिसराचे रुपांतर विद्यापीठात होऊ शकते, अशीही भावना व्यक्त केली.

     येथील विद्यापीठाच्या उप परिसराचे रुपांतर विद्यापीठात करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्या समवेत महिनाभरात बैठक घेतली जाईल.त्यांना हा विषय समजून सांगितला जाईल.तसेच ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल.तसेच इतर राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी चर्चा करुन सर्व सहमतीने तसेच डॉ.माशेलकर यांच्या समितीने  दिलेल्या अहवालाचा विचार करुनच पुढील दिशा ठरविण्यात येईल,असेही श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

        या उपपरिसरातील शैक्षणिक सुविधामध्ये वाढ करण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.याबाबत विद्यापीठाचे कुलगुरु आणि पदाधिकारी यांची बैठकही घेता येईल.असे सांगून श्री.सामंत यांनी विद्यापीठाची जागा कोणत्याही परिस्थितीत एमआयडीसीला देण्यात येणार नाही. विद्यापीठाची जागाही शैक्षणिक विकासासाठी आहे.तेव्हा तिचा उपयोग त्याच कामासाठी झाला पाहिजे.तसेच खेलो इंडिया अंतर्गत निधी मिळवून येथील क्रीडांगणाचा विकास करण्याच्या या कामात खासदार निंबाळकर यांनी पुढाकार घ्यावा,असे सुचवून 2019 नंतर विद्यापीठा परिसर शासकीय तंत्र निकीतनमध्ये बांधलेल्या वसतीगृहांना मोतोश्री वसतीगृह असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.याबाबतचा आढावा घेऊन संबंधित अहवाल सादर करावा,असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

        विद्यापीठाच्या उप परिसरातील सभागृहात मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कोविड योध्दा म्हणून निवड झालेल्या विक्रम माणिक राठोड यांचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात जीवाची बाजी लावून एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी काम केले आहे.त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक करणे आवश्यक आहे.म्हणूनच मी अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करतो आहे.एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांमुळे एका गावात एकही कोरोना पॅझीटिव्ह रुग्ण आला नाही म्हणजे त्याने केलेल्या जागृतीच्या कामाचा तो परिणाम आहे.

हिंगोलीत तर एका एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाचे शेव पॅकिंग करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम केले.आपले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यात एन एस एसचे उपक्रम राबून विद्यार्थ्यांत सामाजिक भान निर्माण करण्याचे आणि भावी चांगले नागरिक घडवण्याचे मोलाचे काम करीत आहे.एन.एस. एसप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयात एनसीसी सुरु करण्याचे प्रयत्न विद्यापीठाने करावे.एनएसएसच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हे काम उत्तम प्रकारे करण्यासाठी राज्याच्या निधीतून पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत.यापुढे दर वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट एन.एस.एस. विद्यार्थ्यास गौरवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

    यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या एका समारंभात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या 10 व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा श्री. सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. हे 10 व्हेंटिलेटर श्री.सामंत यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील यांच्याकडे दिले.

                               

From around the web