जलजीवन मिशन अंतर्गत एक लाख नळांच्या कनेक्शनचे काम 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करा

-  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 
digavkr

  उस्मानाबाद - जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात गेल्या जानेवारी 2021 पर्यंत 78 हजार नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट साध्य करुन गेल्या वर्षी 113 टक्के म्हणजे उद्दिष्टांपेक्षा अधिक काम केले आहे.  त्याबद्दल संबंधित सर्वांचे अभिनंदन. आता या 78 हजारांत 22 हजार नळ कनेक्शनची भर घालून येत्या 15 सप्टेंबर 2021 पर्यंत एक लाख नळ कनेक्शनचे उद्दिष्ट साध्य करा. असे निर्देश जिल्हा जलजीवन मिशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

       येथील जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत घेतलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 2021-22 च्या जिल्हा स्तरीय आराखड्यास मंजुरी देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, तेंव्हा ते बोलत होते. यावेळी जि.प.चे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता आवटे, जीवन प्राधिकरणाचे श्री. पोतदार, भूजल सर्वेक्षण कार्यालयाचे प्रतिनिधी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          गावातील प्रत्येक घराच्या परिसरात नियमीत सुरु असणारी नळ जोडणी व्यवस्था करणे, प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणी द्वारे येत्या 2024 पर्यंत पाणी पुरवठा करणे अर्थात ‘हर घर नल से जल’ देणे, दर डोई दर दिवशी किमान 55 लिटर शुध्द पाण्याचा पुरवठा करणे आणि कार्यक्षम पाणी पुरवठ्याची शाश्वत सेवा उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मूळ हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमात काम करणाऱ्या यंत्रणांनी समन्वयाने आणि वेळेत आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची गरज आहे.असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर म्हणाले, नळाद्वारे पाणीपुरवठा करताना ते पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि इतर मुलभूत घरगुती गरजांसाठी सुरक्षित, शाश्वत तसेच पुरेसे असणे आवश्यक आहे. हे पाणी गुणवत्तेच्या मानकासह सर्व परिस्थितीत सोयीस्कर व सहज उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध सध्याच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाण्याची तपासणी करुन त्याची गुणवत्ता निश्चित करणे, त्या पाण्याच्या स्त्रोतांचे गरज असेल तर बळकटी करणे, पुनर्भरण करणे आवश्यक आहे.

          जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाचा दर पंधरा दिवसांनी संबंधित यंत्रणांचा आढावा घेण्याची जबाबदारी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येईल. त्यासाठी त्यांना प्राधिकृत करण्यात येईल. याशिवाय या कार्यक्रमांतर्गत योजनाची पाहणी केवळ अभियंत्यानीच करावी, असे नाही तर त्या-त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करावी. योजनांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना कालावधी निश्चित करुन देण्यात यावा, या योजनेतील काम दीर्घकाळ टिकेल याची काळजी घेऊन ते दर्जेदार स्वरूपातच केले पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर म्हणाले, काही गावांतील पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या दुरुस्ती बरोबरच पाण्याच्या स्त्रोताची पाहणी करावी, पर्यायी स्त्रोत शोधावेत किंवा पर्यायी स्त्रोतांचाही विचार करण्यात यावा. मी स्वत: या योजनेतील कामांची पाहणी करणार आहे, तेंव्हा त्या बाबतचा कार्यक्रम ठरवून मला कळवावे, असेही ते म्हणाले.

          सोलारवर आधारित पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या तक्रारी कालांतराने येतात. तेंव्हा सोलारवर आधारित योजनांचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे. यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. अशा योजनांचे क्लस्टर करण्यात आले तर तसे करावे. योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया राबवून तरतुदीनुसार सोलार पंपाचे आणि हापसा योजनेचे काम एकत्रित करावे; असे सांगून श्री.दिवेगावकर यांनी शाळा, अंगणवाड्यांना नळ कनेक्शन प्राधान्याने देण्यात यावे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे पुनर्भरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागातील ‘रिचार्ज मॅप’ चा उपयोग करावा. भूजल सर्वेक्षण विभागाने नियमितपणे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीचे काम करावे. ज्या स्त्रोताचे पाणी गुणवत्तापूर्ण नाही ते वापरण्यास प्रतिबंध असल्याचे फलक लावण्यात यावेत. यासाठी ग्रामसेवकांची  जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जुन्या विहिरी, कुंड आणि बारवांची स्थानिकांच्या मदतीने साफ-सफाई करुन त्यातील पाण्याची तपासणी करुन ते पाणी वापरायोग्य असल्यास त्याचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

          जिल्ह्याच्या जलजीवन विषयक कृती आराखड्याप्रमाणे 2021-22 ते 2023-24 अंतर्गत जिल्ह्यातील 720 गावांपैकी सुधारणात्मक पुनर्जोडणी अंतर्गत वर्गवारी ‘अ’ मध्ये 249 गावांत 72 कोटी 80 लाख रुपये अंदाजित खर्चाची तर ‘ब’ वर्गवारीत 339 गावांत 97 कोटी 24 लाख रुपये अंदाजित खर्चाची कामे करणे अपेक्षित आहे. नवीन 136 योजना प्रस्तावित आहेत. त्यावर 76 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील 188 गावे, वाड्या आणि वस्त्यांवर सोलार पंप प्रस्तावित असून त्यावर 14 कोटी 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या सर्व योजनांवर 261 कोटी 13 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

          जिल्ह्यात शिल्लक नळ जोडणीचे 90 हजार 13 एवढी कामे करणे अपेक्षित आहे. ‘अ’ वर्गवारीतील 249 गावांमध्ये 30 हजार 498 नळ जोडणीचे तर ‘ब’ वर्गवारीतील 339 गावांतील 34 हजार 760 नळ जोडणीचे काम करावयाचे आहे. 324 गावांमध्ये नवीन योजना प्रस्तावित आहे. त्यांच्या नळ जोडणीची संख्या 24 हजार 755 एवढी असेल. दरम्यान, आजच्या बैठकीत जिल्हास्तरीय आराखड्यास जिल्ह्यातील 720 गावांमध्ये ‘अ’ वर्गवारीत 249 तर ‘ब’ वर्गवारी 339 सुधारणात्मक पुनर्जोडणीच्या योजनाचा तर नवीन प्रस्तावीत योजनेत 136 योजनांत सोलार पंप प्रस्तावित गावे,वाड्या,वस्त्यांच्या 188 योजनांचा समावेश आहे. आजच्या या बैठकीत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.

From around the web