धाराशिव कारखान्यातील ऑक्सिजन प्रकल्प दोनच दिवसात कार्यान्वित करा

 पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या जिल्हा  प्रशासनाला सूचना
 
d

उस्मानाबाद,- धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे  काम अंतिम टप्प्यात असून दोनच दिवसात ऑक्सिजन निर्मिती सुरू होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. शंकरराव गडाख यांनी आज येथे व्यक्त केला आहे.        

शुक्रवारी (ता. सात) त्यांनी धाराशिव साखर कारखाना प्रकल्पावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अतिरीक्त जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी  उपस्थित होते.


यावेळी श्री. गडाख म्हणाले की, कारखान्याचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. तरीही अगदी युद्धपातळीवर काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा सेटअप पूर्णपणे झाला आहे. त्यामुळे ऑक्सीजन निर्मितीसाठी जे अडथळे होते, ते पूर्णतः दूर झाले आहेत. आता फक्त विजेचा प्रश्न प्रलंबीत आहे. या प्रकल्पाच्या ऐवजी इथॅनॉल निर्मिती करण्याचे नियोजन होते. मात्र सध्या नागरिकांची गरज बघून ऑक्सीजन निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यासाठी २०० एचपीचा ट्रान्सफार्मर लागणार आहे. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना यापूर्वी सूचना दिल्या होत्या. मात्र फंड नसल्याचे कारण सांगत त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.  

जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ तरतूद करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. वीज जोडणीसाठी लागणारा अतिरीक्त खर्च तात्काळ मंजूर करून एकाच दिवसात हे काम संपविण्याच्या सुचनाही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्री श्री. गडाख यांनी दिल्या.तसेच जिल्हयासाठी विशेष बाब म्हणून तात्काळ व अखंडित विज पुरवठा देण्याचे निर्देश दिले.


ऑक्सिजन टेस्टींगसाठी नोडल अधिकारी:  या प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्या ऑक्सीजनची तपासणी होणार आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री. दुसाने यांच्यावर जबाबदारी दिली आहे. या प्रकल्पामध्ये तयार होणा-या ऑक्सीजनचे सँपल घेऊन अधिकारी पनवेल येथील कार्यालयात जाणार आहेत. टेस्टींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्सीजन थेट रुग्णांच्यासाठी वापरात येणार आहे. त्याची जबाबदारी  अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे .  टेस्टींग त्वरित  पूर्ण करण्याच्या सूचना  त्यांनी दिल्यानंतर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याची नेमणूक करून कार्यवाही सुरू केली आहे.

अभिजित पाटील यांचे कौतुक 

कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी अगदी कमी वेळेत आणि स्वतःचा आर्थिक तोटा सहन करीत या प्रकल्पाची उभारणी केली आहे. यासाठी स्वतः श्री . पाटील मेहनत घेत आहेत. अगदीच थोडक्या दिवसात ही मशीनरी बसविण्यासाठी मेहनत घेतली. सर्वच कामात स्वतः लक्ष देऊन काम पूर्ण करून घेतले. अन्य कोणावर विसंबून न राहता तात्काळ प्रकल्प पूर्ण केला. त्यांचे कार्य निश्चित कौतुकास्पद असल्याची भावना पालकमंत्री श्री. गडाख यांनी बोलून दाखविली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने चेअरमन श्री अभिजित पाटील यांचे यावेळी आभारही मानले.


 तुळजापूर भक्त निवसातील कोविड सेटरमधील ऑक्सिजन लाईनचे पालकमंत्री गडाख हस्ते लोकार्पण

श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्यावतीने 300 बेड पैकी  145ऑक्सिजन बेडचे भव्य कोविड सेन्टर तुळजापूरच्या भक्त निवासात उभारले आहे . या कोविड सेंटर मधील  ऑक्सीजन पुरवठा लाईनचे लोकार्पण  पालकमंत्री शंकरराव गडाख  यांच्या हस्ते आज करण्यात आले. भक्तनिवासमध्ये उपचार घेत असलेल्या काही  रुग्णांशी पालकमंत्री श्री .गडाख यांनी  संवाद साधून त्यांच्या तब्येतीची ,औषधोपचार व  सुविधाबाबत  चौकशी केली.यानंतर त्यांनी  उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली आणि  संबंधित अधिकाऱ्यांना लसीकरण व्यवस्थित करण्याबाबत सूचना दिल्या .

From around the web