नुकसानग्रस्त क्षेत्रांचे रँडम सर्वेक्षण होऊन नुकसान भरपाई मिळणार 

- आमदार कैलास पाटील यांची माहिती 
 
d

उस्मानाबाद-  शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि विमा कंपनीचा  पंचनामे करण्यात होत असलेला विलंब पाहता सर्व तक्रारीचा पंचनामे करण्याऐवजी विमा कंपनीने रँडम सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी ,यासाठी आपण पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला यश आले असून प्रधानमंत्री  पिकविमा योजना खरीप हंगामामधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान जोखीम अंतर्गत 25 ते 30 टक्के पुर्वसुचनांचे रॅण्डम सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. 


उस्मानाबाद - कळंब तालुक्यासह जिल्ह्यात  मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 32 मंडळात शेती पिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान होत असून  हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिसकावून घेतला आहे. 

पीकविमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती विमा कंपनीला ऑनलाइन करून कळविण्यास सांगितले होते. त्यात काही अडचणी येत असतील तर गावचे कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज करून माहिती देण्याचेही आपण आवाहन केले होते.

या वर्षी जिल्ह्यातील सहा लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी पिकविमा भरून आपली पिके विमा संरक्षित केली. मात्र आजपर्यंत पिकविमा कंपनीस नुकसानीची माहिती कळविणाऱ्याची संख्या दोन लाख ८३ हजार आहे.अजूनही पिकविमा कंपनीस तक्रार दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या अर्जाची संख्या अजून वाढणार आहे. ज्याप्रमाणात तक्रार दाखल करण्याची संख्या वाढत आहे त्याप्रमाणात विमाकंपनीने पंचनामे केलेले नाहीत. अजूनही दोन लाख नऊ हजार पंचनामे होणे शिल्लक आहे. विमा मिळण्यासाठी वैयक्तिक पंचनामे होणे गरजेचे आहे,यामुळे शेतकरी पिक काढण्यासाठी वाट पाहत होते.

परंतु विमा कंपनीकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैयक्तिक पातळीवर पंचनामे होणे शक्य नाही.वाढती अर्जसंख्या आणि अपुऱ्या मनुष्यबळाने होणारे पंचनामे याची बरीच मोठी तफावत आहे. विमा कंपनी विविध कारणे देऊन नुकसानभरपाई देण्याचे टाळत आहे. त्यामुळे शेतकरी विमा कंपन्यानी पंचनामे होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे पदरात पडणारे १० ते 20 टक्के सोयाबीन ही पंचनाम्याच्या अभावी पदरात पडणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. 

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि विमा कंपनीला पंचनामे करण्यात होत असलेला विलंब याचा विचार करुन आपण विमा कंपनीने रँडम सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रधानमंत्री पिकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जोखीम अंतर्गत 25 ते 30 टक्के पुर्वसुचनांचे रॅण्डम सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यानी आदेश काढले आहेत.

सॅम्पल सर्व्हेच्या आधारे ज्यांनी ऑनलाइन नोंद केली आहे त्यांना नुकसान भरपाई निश्चितच झाल्यानंतर विमा मिळू शकेल, सॅम्पल सर्व्हेमुळे प्रत्येक शेतकऱ्यांने पिक कापणीसाठी पंचनाम्याची वाट बघण्याची गरज नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.या आदेशानंतरही इतर मंडळामध्ये विमा क्षेत्राच्या २५ टक्क्यापेक्षा सुचना प्राप्त झाल्या तेथेही हे आदेश लागु राहणार असल्याचे आदेशात म्हटल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

हा निर्णय सर्वच पिकांसाठी लागु राहणार असुन हे सर्वेक्षण करताना तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या समन्वयाने कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक असणार आहे. विमा कंपनी प्रतिनिधी या सर्वेक्षणास उपस्थित असावा अन्यथा महसूल व कृषि विभागाने केलेले सर्वेक्षण ग्राह्य धरणे कंपनीला बंधनकारक राहणार आहे असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

d

f

s

From around the web