ध्वजनिधीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी मदत करावी : दिवेगावकर

 
s

उस्मानाबाद - सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलात उस्मानाबाद जिल्ह्याचे 2020 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 325 टक्के ध्वजनिधी संकलनाचे काम केले आहे. याही वर्षी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल.यासाठी अधिकारी,कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी मदत करावी. त्याशिवाय माजी सैनिक आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल येथे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल 7 डिसेंबर या ध्वज दिनानिमित्त ध्वजनिधी संकलन – 2021 च्या शुभारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला तेव्हा श्री.दिवेगावकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, सोलापूर येथील आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार आदी उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसहाय्य व्हावे त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी 07 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर पर्यंत निधी गोळा केला जातो.

स्वातंत्र्या पूर्वी ही दर वर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस पोपी दिवस म्हणून पाळण्यात येत होता. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या समितीने 28 ऑगस्ट 1949 रोजी 1949 पासून पुढे 07 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्याचे निश्चित केले आहे. तेंव्हापासून 07 डिसेंबर हा दिवस प्रती वर्षी ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. सैनिकांप्रती समाजाचे काही ऋण आहे. देशाच्या सीमांचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करत असताना देशात उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्था विषयी समस्या, अतिवृष्टी, वादळे किंवा भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या मदतीला तात्काळ धावून जावून अमूल्य कामगिरी करणाऱ्या आपल्या सैनिकांचे ऋण अल्प प्रमाणात परत करण्याची अप्रतीम संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त होते. तरी यातून ऋणमुक्त होण्याचा फायदा उदात्त अंत:करणाने पैशाच्या स्वरूपात ध्वजदिन निधीस मदत करुन स्वत: भाग्यवान व्हावे, असेही आवाहन श्री. दिवेगावकर यांनी यावेळी केले.

ध्वजदिन निधी गोळा करण्याच्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करुन करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील  सर्व जनतेने पुढे येऊन आपल्या सैनिकांप्रती पैशाच्या स्वरुपात प्रेम भावना प्रगट करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यास ध्वजदिन 2021 साठी 41 लाख 28 हजार निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 2020 मध्ये 41 लाख 28 उद्दिष्ट असताना एक कोटी 34 लाख 36 हजार रुपयांचा ध्वजनिधी जमा करुन 325 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय, खाजगी संस्थातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ध्वजनिधी संकलनात सहभाग दिला पाहिजे. वर्ग एक अधिकारी यांनी प्रत्येकी 300 रुपये, वर्ग दोन अधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दोनशे रुपये, वर्ग तीन कर्मचाऱ्यांनी शंभर रुपये तर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी 50 रुपये ध्वजनिधी द्यावयाचा आहे. रोख रक्कम, बँक धनादेश, धनाकर्षाद्वारेच “मा.जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद” यांच्या नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, येथे 30 जानेवारी 2022 पर्यंत जमा करता येईल. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी 02472-225557 वर संपर्क करावे, असेही आवाहन मेजर तुंगार यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दोन मिनिटे उभे राहुन शहिद सैनिकांना मानवंदना देण्यात आली.

From around the web