१८ जून रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस
उस्मानाबाद - १८ जून रोजी जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे याकरिता जिल्ह्यामध्ये १८ जून रोजी २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रभागांमध्ये ५ ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ३, उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत प्रभागांमध्ये १ ग्रामीण रुग्णालय अंतर्गत प्रभागांमध्ये आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
लाभार्थ्याने लसीकरणासाठी जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ ४५ वर्षावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना पहिला डोस दिला जाणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्याने लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.
लसीकरण केंद्र ठिकाण पुढीलप्रमाणे -
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद अंतर्गत भाजी मंडई काकडे कॉम्प्लेक्स उस्मानाबाद, डॉ अखलाख दवाखाना उस्मानाबाद,
- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद अंतर्गत श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद नुतन विद्यामंदिर उस्मानाबाद,
- ग्रामीण रुग्णालय मुरूम अंतर्गत नूतन प्राथमिक शाळा मुरूम, ज्ञानदान शाळा मुरूम,
- उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर अंतर्गत नगर परिषद शाळा क्रमांक ३ तुळजापूर,
- उपजिल्हा रुग्णालय कळंब अंतर्गत नगर परिषद इमारत चोंदे गल्ली कळंब,
- उपजिल्हा रुग्णालय परंडा अंतर्गत सरस्वती विद्यालय परंडा या ठिकाणी प्रत्येकी २०० डोस उपलब्ध असणार आहेत लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत आहे.
ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असणार असून लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत आहे.
जिल्ह्यामध्ये १८ जून रोजी एकूण १६ लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत. तर लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार असून लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे.
यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे