उस्मानाबाद शहरातील ४५ वर्षा पुढील नागरिकांना ५ दिवस मिळणार कोविशिल्ड लस

 
corona las

उस्मानाबाद  - उस्मानाबाद शहरामध्ये १५ ते १९ जून रोजी २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रभागांमधून प्रायोगिक तत्त्वावर ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना लसीचा डोस दिला जाणार आहे. यामध्ये ६० वर्षावरील नागरिकांना आणि ४५ वर्षाच्या वरील दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार असून यासाठी प्रभागांमधून कोविड लसीकरणाबाबत नियोजन करण्यात आले.

 दि.१५ जून ते १९ जून या दिवशी लसीकरण सत्र आयोजन करण्यात आलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत- 

  • १५ जून रोजी नगर परिषद शाळा क्रमांक १४ खाजानगर, तेरणा महाविद्यालय नगर परिषद शाळा क्रमांक १८ शांतिनिकेतन 
  •  १६ जून रोजी नगर परिषद शाळा क्रमांक २० गणेश नगर, नगर परिषद शाळा क्रमांक २३ पोहनेर रोड, सरस्वती विद्यालय बँक कॉलनी, नगर परिषद शाळा क्रमांक ११ समता नगर,
  • १७ जून रोजी मौलाना आझाद शाळा दगडी शाळा, नगर परिषद शाळा क्रमांक ९ भिमनगर, भाई उद्धवराव पाटील विद्यालय संभाजीनगर नगर, परिषद शाळा क्रमांक २२ उंबरे कोटा येथे 
  • दि.१८ जून रोजी काकडे कॉम्प्लेक्स, डॉ अखलाख दवाखाना, श्रीपतराव भोसले हायस्कूल, नूतन विद्यामंदिर व
  • दि.१९ जून रोजी आर्य चाणक्य महाविद्यालय, नगरपरिषद शाळा क्रमांक ६ सांजा रोड, नगर परिषद शाळा क्रमांक २४ रामनगर या सर्व लसीकरण केंद्रावर प्रत्येकी २०० डोस उपलब्ध असणार आहेत.

लसीकरणाची वेळ सकाळी ९ पासून दुपारी २ वाजेपर्यंत असून लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. विशेष म्हणजे या दिवशी केवळ ४५ वर्षावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. तर लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे.

 लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नगर परिषद व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी, लसीकरणामध्ये मदत करावी व उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web