चितळे सापडले , जैन कधी सापडणार ? 

हावरगाव शंभू महादेव कारखाना  /परळी  वैजनाथ बँक संयुक्त साखर घोटाळा 
 
s

उस्मानाबाद - हावरगावच्या शंभू महादेव साखर कारखान्याने  परळी येथील वैजनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयाच्या साखर घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या वैजनाथ बँकेचे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना पाच दिवसाची म्हणजे ७  सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक जैन यास पोलीस अटक करीत नसल्याने दोघांचे साटेलोटे आहे का ? असा सवाल विचारला जात आहे. गुन्हा दाखल होवून पाच महिने झाले तरी ४० पैकी ३६ आरोपी पोलिसांना सापडत नाहीत , याचे लोकांना आश्चर्य वाटत आहे. 


हावरगावच्या शंभू महादेव साखर कारखान्याने  परळी येथील वैजनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयाच्या साखर  घोटाळा प्रकरणी  कळंब पोलीस स्टेशनध्ये १२ मार्च २०२१ रोजी हावरगावच्या शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह ४० आरोपीविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ४०१ आदी कलमानुसार गुन्हा दाखल आला होता. परळीच्या सुभाष निर्मेळ  - पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. 

त्याचा तपास उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हा दाखल होवून आजमितीस पाच  महिने झाले तरी पोलिसांनी केवळ चारच आरोपीना अटक केली आहे. अन्य ३६ आरोपी मोकाट फिरत असताना, पोलीस चिरीमिरी घेऊन अटक करीत नसल्याचा आरोप केला जात आहे.


याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने २२ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित करताच, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जाग आली. त्यानंतर काल  वैजनाथ बँकेचे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना अटक केली आहे, चितळे यांना  कळंब न्यायालयात उभे करण्यात आले असता, ७  सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आतापर्यंत चार आरोपीना अटक 

हावरगाव शंभू महादेव कारखाना  / परळी वैजनाथ बँक संयुक्त साखर घोटाळा प्रकरणी एकूण ४० आरोपीवर गुन्हा दाखल आहे. पैकी शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट सध्या जेलमध्ये आहेत. 

वैजनाथ बँकेचे  सीईओ  महेशचंद्र  कवठेकर आणि केज शाखेचे मॅनेजर तथा शंभू महादेव साखर कारखान्याचे नियंत्रक  प्रसाद कुलकर्णी हे जामिनावर आहेत. 

दोन दिवसापूर्वी सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना पोलिसांनी अटक केली  आहे. पण मुख्य आरोपी आणि राज्यातील सर्वात मोठा साखर व्यापारी अशोक जैन यास पोलीस अटक करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आहे. पोलीस मॅनेज झाल्याने आरोपी उजळ माथ्याने फिरत आहेत. एकीकडे आम्ही अमुक आरोपी अटक केला म्हणून प्रेसनोट पाठवणारे उस्मानाबाद पोलीस अशोक जैन यास अटक केल्याची प्रेसनोट कधी पाठवणर ? की  नोट घेऊन गप्प बसणार ? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत. 


 काय आहे प्रकरण ? 

कळंब तालुक्यातील हावरगाव येथील शंभु महादेव शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याची स्थापना 2000 मध्ये झाली असून कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट आहेत. शंभु महादेव शुगर अन्ड अलाईट इंडस्ट्रीज लि. हावरगाव या कारखान्यासाठी चेअरमन दिलीपराव आपेट व कारखान्यांचे संचालक मंडळांनी या कारखान्यासाठी 2002 पासून 2017 या कालावधीमध्ये वेळोवेळी तोडणी, वाहतूक, यंत्रणा उभारणीसाठी, शेतकऱ्यांना ऊसबील देण्यासाठी साखर कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर साखर तारण व कारखाणा मॉडगेज करून 46 कोटी 23 लाख रूपये कर्ज घेतले. हे कर्ज वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक, परळी, नागरी सहकारी बँक लि. नागपूर, द्वारकादासमंत्री नागरी सह. बँक बीड, सोलापूर जनता अर्बन बँक सोलापूर, नगर अर्बन को-ऑप बँक नगर, नांदूरा अर्बन को-आप बँक लि. नांदूरा, वर्धा नागरी सहकारी बँक लि. वर्धा, भाग्यलक्ष्मी महिला सह. बँक लि. नांदेड, जनसेवा सह बँक लि. हडपसर पुणे, जनकल्याण अर्बन को आप बँक लि. कळंब, दिनदयाळ अर्बन को-आप बँक लि अंबाजोगाई, जनसेवा सह बँक लि. बोरिवली लि., जनता सहकारी बँक लि. वसई, अकोला जनता कम. को-आप बँक लि. अकोला., स्टेट बँक आफ हैद्राबाद, शाखा कळंब, डोंबिवली नागरी सह. बँक लि. डोंबिवली, जळगाव जनता सह बँक लि. जळगाव, जनता सह बँक लि. पुणे, खामगाव अर्बन को-आप बँक लि. खामगाव या बँकांकडून सदरची रक्कम जमा करून वैयक्तीक जिम्मेदारीवर हावरगाव येथील शंभु महादेव कारखान्याला दिले होते. कर्ज हे कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर व कारखान्याच्या व इतर स्थावर मालमत्तेवर गहाणखताद्वारे देण्यात आले होते.

कर्ज देताना दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन व शंभु महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांनी साखर कारखान्यामध्ये 2017 मध्ये शंभु महादेव साखर कारखाना हावरगाव येथील साखरेच्या गोडाउनमध्ये 154177 एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणुन साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखर साठय़ाच्या गोडाउनला दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेने स्वत:चे मालकीचे कुलपे लावून सील केले होते. तसेच या साखर साठय़ावर नियंत्रक म्हणुन स्थानिक बँक अधिकारी म्हणुन नियुक्त केले होते. तारण साखर साठय़ाच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. तारण साखर साठा खुल्या बाजारात विक्री करण्याचे बँक व साखर कारखाना यांच्यातील करारामध्ये ठरले होते. शंभु महादेव कारखान्यास ज्यावेळेस साखर टेंडरद्वारे (जाहिर निवीदा काढून ) विक्री करावयाची आहे. त्या-त्या वेळी कारखाना जेवढा साखर साठा विक्री करावयाचा आहे. तेवढया साखरेच्या रक्कमेचा भरणा वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँक लि. मुख्य कार्यालय परळी येथे किंवा दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. शाखा केज येथे या बँकेस करत होते. त्यानंतर दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखी आदेशाने भरणा केल्यानंतर भरणा केलेल्या रक्कमेइतका साखर साठा शंभु महादेव साखर कारखाना यांच्या मार्फतीने खरेदीदारास दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळीचा शंभु महादेव साखर कारखाना हावरगांव येथे नियुक्त केलेला स्थानिक बँक अधिकारी मार्फतीने देण्यात येत होता.


 
सदरचा साखरसाठा खरेदीदारास देताना तारण ठेवलेल्या साखरेच्या स्टॉक रजिस्टरवरती नोंदी करून देण्यात येत होते. शंभु महादेव कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट व दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांचे वैयक्तीक आर्थीक स्वरूपाचे व्यवहार होते. चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांनी वेळोवेळी स्वत:चे आधिकारात 2013 पासुन ते 2017 या कालावधीमध्ये नियमानुसार कर्ज वाटप न करता इतर सहभागी 18 बँकाना कोणतीही पूर्वकल्पना न देता, तसेच 2017 मध्ये साखर आयुक्त यांचा कारखान्यास गाळप परवाना नसतानाही बेकायदेशीर कर्जपुरवठा केला. चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांनी कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेकडे तारण असलेला साखर साठा परस्पर विक्री केला. गोडावूनमध्ये असलेला तारण साखर साठा 154177 पोते परस्पर विक्री करून 27 कोटी 23 लाख रूपयाचा अपहार केला. हा अपहार जुलै 2017 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शंभु महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट (रा. पद्मावती गल्ली, परळी) , वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन (रा. स्वाती नगर, हालगे गल्ली, परळी ), वै.अ.को-आप बँक शाखा केज शाखा व्यवस्थापक प्रसाद त्रिंबकराव कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद मुरलीधर खर्चे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मधुकर चितळे (रा. परळी), तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी महेशचंद्र गणपतराव कवठेकर (ह.मु. संभाजीनगर), मॅनेजर वैद्यनाथ बँक परळी संजय पंढरीनाथ खंदारे व दि. वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ मधील कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

From around the web