उस्मानाबाद जिल्ह्यात बालविवाह मुक्त गाव संकल्पना राबवणार  

 मुलींच्या प्रश्‍नांच्या सोडविणूकीसाठी बसविणार शाळेत तक्रार पेटी 
 
s
-  जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येणार असून शाळकरी मुलींच्या बालविवाह, आरोग्य, शिक्षण यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवून मुलींच्या मनात भेडसावणार्‍या समस्यांना सोडवण्यासाठी पालक-शिक्षक- संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जि.प अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने उस्मानाबाद शहरातील शम्स उर्दू हायस्कूल येथे आयोजित किशोरवयीन मुलींसाठी बालविवाह निर्मुलन संवाद कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी गटशिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार, जिल्हा लसीकरण अधिकारी कुलदीप मिटकरी, उपशिक्षण अधिकारी (मा) रत्नमाला गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी अरुणा कांबळे, दैवशाला हाके, संजय बागल, युनिसेफच्या प्रतिनिधी सोनिया हंगे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे व शम्स उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष शेख लइख अहमद अब्दुल रहिम यांची  उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना सौ.कांबळे पुढे म्हणाल्या की, उस्मानाबाद जिल्ह्याने माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी, घरकुल योजना, कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण या विविध विषयात चांगली कामगिरी केल्याचे सांगितले.   त्या पुढे म्हणाल्या की बालविवाहाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने विवाह पुर्व  नोंदणी करून घेणे व मुला-मुलींच्या पालकांनी मुलाचे  मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र, आधार कार्ड देणे आवश्यक असणार आहे.  त्यामुळे विवाहापूर्वीच मुला मुलींच्या वयाची माहिती झाल्यामुळे बालविवाह गावातच रोखता येऊ शकतील.

ग्रामीण भागातल्या शाळकरी मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून गावपातळीवर आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी बालविवाह रोखण्यासाठी डोळसपणे कार्य करण्याची गरज आहे. अंधश्रद्धा गैरसमजुती तसंच मुला-मुलींचे गळतीचे वाढलेले प्रमाण यामुळे बालविवाह, बालमजुरी यात वाढ झाली असून ती कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने  'ती सध्या काय करते?  यावर आधारित सर्वेक्षणातून माहिती संकलित करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

याप्रसंगी शम्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. सय्यद तबस्सुम सुलताना बाजी यांनी दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शागीर्द सर व आभार प्रदर्शन  सोहेल सर यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शेख लइख अहमद अब्दुल रहिम, सचिव शेख लईख अहमद शब्बीर अहमद, खजानची मुजीब साब, डॉ शम्सुल उलुम उर्दु हायस्कूलचे  हेड मास्टर काझी रेशमा परविन ताजोददीन बाजी, गुलशन ए अतफाल उर्दु प्राथमिक स्कूलचे  हेड मास्टर मोहसीन सर तसेच सर्व स्टाफ व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

From around the web