धारूरची महिला ग्रामसेविका आठ हजराची लाच घेताना चतुर्भुज

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील एका शेतकऱ्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम केले होते. त्या कामाच्या अनुदानाचा चेक काढण्यासाठी महिला ग्रामसेवकाने आठ हजार रुपयांची लाच मागितली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून चतुर्भुज केले.
धारूर येथील एका शेतकऱ्यास महात्मा गांधी राष्ट्रीय योजने अंतर्गत शेतात विहीर मंजूर करण्यात आलेली आहे. विहीर पूर्णपणे खोदण्यात आली असून त्याचे कुशल कामाचे २६ हजार ६६७ रुपये अनुदान काढण्याची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराचा ३७ वर्षीय मुलगा त्या गावच्या ग्रामसेविका सौ.अमरजा मुकुंद शेखदार,वय ४२ वर्षे, धारुर ता उस्मानाबाद ( रा.78/1,विद्यानगर, शेळगी, सोलापुर शहर) यांच्याकडे गेला असता ग्रामसेविकेने ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती १० हजार रुपये देण्याचे ठरले व त्यापैकी ८ हजार रुपये दि. १ जून रोजी देण्याचे ठरले.
परंतू तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने सर्व खातरजमा केली. तर दि.१ जून रोजी दुपारी २.५५ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेविकेला ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडले.
हा सापळा औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी सापळा लावून ही यशस्वी कामगिरी केली. या पथकामध्ये पोहेकॉ दिनकर उगलमुगले, पांडूरंग डंबरे, पोना अर्जुन मारकड, मधुकर जाधव,पोका विष्णू बेळे, चालक पोना करडे यांनी केली.
कोणत्याही शासकीय कामासाठी एखाद्या लोक सेवकाने अथवा लोकप्रतिनिधींनी तसेच एकादे शासकीय काम केल्याबद्दल बक्षिसी म्हणून काही रकमेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन संपते यांनी केले आहे.