उस्मानाबाद तहसिल कार्यालय आणि बँक ऑफ बडोदा शाखेचा अनागोंदी कारभार
पाडोळी - उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बेंबळी), कोंड सह इतर गावातील अनेक शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. तहसील कार्यालय आणि बँक ऑफ बडोदा बँकेतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी अनुदान देऊ म्हणून घोषणा केली होती, मात्र आज प्रत्यक्षात दिवाळी होऊन पंधरा दिवस झाले तरी अजून हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेकांची दिवाळी ही उसनवारी करून ,कमी भावात सोयाबीन विकून झाली आहे.
टाकळी (बें) येथील अनेक शेतकरी हे बँक ऑफ बडोदा ,तहसील कार्यालय आणि जमा होणाऱ्या बँकेत चकरा मारून थकले असून सर्व ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याकडून टोलवाटोलवीचे उत्तरे ऐकायला मिळत आहेत.
टाकळी (बे) येथील अनेक शेतकऱ्यांनी अनुदान जमा होणेसाठी बँक ऑफ इंडियाचे खाते नंबर दिले आहेत. खातेत पैसे आता तरी जमा झाले असतील ह्या आशेवर अनेक शेतकरी रोज बँक ऑफ इंडिया बँकेत चकरा मारत आहेत, तेथील अधिकारी हे बँक ऑफ बडोदा या बँकेत जावा आणि तेथे चेक करा म्हणून सांगत आहेत.तेथे गेले तरी तुमच्या खातेत पैसे जमा झाले आहेत, परत बँकेत जाऊन बघा म्हणून उत्तर देत आहेत.
तहसील कार्यालयात गेले तरी तेथे कोणी दखल घेत नाहीत. प्रत्यक्षात अनुदान कधी जमा होईल या विवेचंनेत अनेक शेतकरी अनुदानाची वाट पाहत बसले आहेत. ज्या प्रमाणे काल उस्मााबाद जिल्हाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एस.बी.आय.बँकेत जाऊन उकल केली तशीच उकल तहसील आणि बँक ऑफ बडोदा बँकेत जाऊन करावी., अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.