उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची  मंजुरी , आता धाराशिव म्हणा.... 

 
s

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरआणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असं असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केलं आहे. 

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याची मागणी जुनी होती. युती सरकारच्या काळापासून यासाठी प्रयत्न सुरू होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक औरंगाबाद व उस्मानाबादचा उल्लेख संभाजीनगर व धाराशीव असाच करत. पक्षाचं मुखपत्र दैनिक सामनात आजही तसाच उल्लेख केला जातो. १९९५ साली युतीचं सरकार असताना तत्कालीन राज्य मंत्रिमंडळानं या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता.

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर अन् उस्मानाबादचं धाराशिव नामांतराचा प्रश्न अनेक दिवस चर्चेत होता. अखेर केंद्र सरकारकडून नामांतराला मंजूरी मिळली आहे .नामांतराला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांचे आभार मानले.

  • 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.
  • 14 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला.
  • 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.
  • 24 फेब्रुवारी 2023 : केंद्र सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव... याला मंजुरी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील केंद्र सरकारनं पाठवलेलं पत्र ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 'करून दाखवलं' असं फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

उस्मानाबादचं जुनं नाव धाराशिव 

निजामाने मराठवाड्यातील अनेक शहरांची नामांतरे केली होती. त्यामध्ये उस्मनाबाद या शहराचाही समावेश आहे. उस्मानाबादचं जुनं नाव धाराशिव असंच  होतं. ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे पुरावे सापडतात. पण निजामशाही मधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे.

असा आहे धाराशिव नावाचा इतिहास
स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव ‘धारासुरमर्दिनी’ झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. 

राष्ट्रकूट राजवंश हा मराठवाडा-विदर्भ या भागात उदयाला आला. या राजवंशात गोविंद-तृतीय हा पराक्रमी राजा होऊन गेला. त्यावेळेच्या ताम्रपटांमध्ये धाराशीव हे नाव आढळल्याचा संदर्भ ‘धाराशिव ते उस्मानाबाद’ या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार व लेखक भारत गजेंद्रगडकर यांनी इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांच्या मुलाखतीतून मिळाल्याचं नमूद केलं.

१९७२ साली शासनाने प्रकाशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रथम गॅझेटियरमध्ये देखील धाराशिव नावाचा उल्लेख आढळतो. तर महानुभाव साहित्यापासून भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या साहित्यापर्यंत धाराशीवच्या नावाचा उल्लेख असल्याचेही सांगितले जात आहे.

From around the web