महिला स्वयंसहाय्यता गटांची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत

उस्मानाबाद - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, रिजर्व्ह बँकेचे अधिकारी श्री .साळुंके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तेव्हा श्री.नेवाळे यांनी हे आदेश दिले .
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणे व खाते उघडणीसाठी प्रलंबित प्रकरणांचा बँकनिहाय आढावा घेण्यात आला. 2021या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य होण्याच्या अनुषंगाने सर्व बँकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन महिला स्वयंसहाय्यता समूहांची प्रलंबित कर्जप्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असे आवाहनही श्री.नेवाळे यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या इमारतीत प्रवेश करत असल्याचे औचित्य साधुन महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या 250 गटांची कर्जप्रकरणे दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी तर उर्वरित सर्व गटांना 10 मार्च 2021 पूर्वी कर्ज वाटप करणार असल्याचे सांगितले . यावेळी त्यांचे सर्वांनी अभिनंदन करताना इतर बँकांनीही अशाच पद्धतीने स्वयंसहाय्यता समूहांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत . कोविड नियमांचे पालन करून बँक मेळावे आयोजित करून कर्ज वाटप करावे , असेही आवाहन श्री नवाळे यांनी यांनी केले. घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात यावे असेही सांगितले आले .
यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विनायक कोठारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड, आरसेटीचे संचालक गोविंद कुलकर्णी तसेच सर्व बँकांचे जिल्हास्तरिय अधिकारी यांची उपस्थिती होती.