कामगारांना ऑनलाईन नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी आवाहन
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय योजनांची जत्रा, योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी, माध्यमातून सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी मंडळाचे www.mahabocw.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. तसेच कामगारांना ऑनलाईन नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी जिल्हा कामगार सुविधा केंद्र उपलब्ध आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कामगारांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजना राबविल्या जातात. कामगारांनी लाभासाठी अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांच्या छाननी तसेच तपासणी अंती परिपूर्ण असलेले अर्जाचे लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात. तसेच नोंदीत कामगार व कुटुंबातील सदस्य यांची आरोग्य तपासणी मोफत केली जाते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप केले जातात.
तसेच जिल्ह्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार असंघटित कामगारांची ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त कामगारांची ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी ई श्रम पोर्टलद्वारे आपली नोंदणी करावी व इतर माहितीसाठी ई श्रम च्या www.eshram.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.