संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात सक्षमपणे 'ब्रेक द चैन' राबवावी
उस्मानाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव खंडित करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्षमपणे ब्रेक द चैन राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक शहर, गाव, वाडी, वस्ती व तांड्यावर शिवसैनिकांनी रिक्षाला भोंगे लावून अनाउन्स करणे, चौकाचौकात फ्लेक्स लावून जनजागृती करणे व कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेला औषधोपचार करण्यासाठी रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी जिल्हा, तालुका व गावातील शिवसैनिकांनी ही मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत व ती यशस्वी करावी, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आ.प्रा. तानाजीराव सावंत यांनी पक्षीय आढावा बैठकीत केले.
येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाची तालुकानिहाय आढावा बैठक आ.प्रा. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा प्रमुख तथा आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, नगरसेवक सुरज साळुंके, सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, शिवजल क्रांतीचे रामचंद्र घोगरे, तालुकाप्रमुख सतीष सोमाणी, संजय मुंडे, भिमाण्णा जाधव, प्रविण कोकाटे, प्रशांत साळुंके, जगन्नाथ गवळी, बाबुराव शहापुरे, मोहन पणुरे, प्रदीप मेटे, तुषार निंबाळकर, राणा बनसोडे, सिद्धेश्वर कोळी, दिलीत जावळे, आनंद पाटील व शाम पवार आदी उपस्थित होते.
या बैठकीत आ. प्रा. सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना पक्ष म्हणून आपले नेमके काय चालले आहे ? याची कोणाला माहितीच नसल्यामुळे संघटनात्मक पातळीवर आपण आपसातील मतभेद विसरून कोरोना सारख्या आपत्तीमध्ये जनतेला मदत करणे आवश्यक आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील खासगी डॉक्टर काय करीत आहेत ? याची माहिती घेऊन कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली काम करुन माझ्या पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आमदार व खासदार यांनी देखील कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक असून प्रत्येक ठिकाणचे कार्यकर्ते बळकट झाले पाहिजेत.
या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणे गरजेचे आहे. लोकांची सेवा करण्याची संधी आली असून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंबुलन्स वाटप करण्याबरोबरच त्या रुग्णांना आवश्यक त्या सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. तसेच सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत प्रशासन पोहोचवीत नसल्यामुळे पूर्वीप्रमाणेच शिवसैनिकांना तडाखेबंद अजेंडा घेऊन यापुढे काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या सेवेसाठी आक्रमक होणे गरजेचे असून तुमचे कार्य पक्षाच्या झेंड्याखाली झाले पाहिजे.
ज्या तालुक्यात रुग्ण कमी त्या तालुकाप्रमुखास पाच लाखांचे बक्षीस
जो तालुका कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आणण्याचा प्रयत्न करील त्या तालुका प्रमुखाला शिवसेनेच्यावतीने मी वैयक्तिकरित्या ५ लाख रुपयांचे बक्षीस देणार असून मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्या तालुकाप्रमुखांचा सत्कार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पायात नव्हे हातात हात घालून काम करा
मागील कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. ही बाब अत्यंत घातक असून त्या पदाधिकाऱ्यांनी एखाद्याच्या पायात खोडा घालून त्याला अटक करून ठेवण्यापेक्षा त्याला सोबत घेऊन हातात हात घालून काम करावे. मी पदाधिकारी आहे मी करील तीच पूर्व दिशा या भ्रमात कोणीही राहू नये जर तसा करण्याचा प्रयत्न केला तर त्या पदाधिकाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे यापुढे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या झेंड्या खालीच जनसेवेचे काम चांगल्या पद्धतीने करावे अशा सक्त सूचना आ. सावंत यांनी दिल्या