ध्वज काढल्याचा राग धरुन केशेगावच्या दलितांवर बहिष्कार  !

सरपंचासह‌ उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
 
d

धाराशिव  - तालुक्यातील केशेगाव येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरपंच ग्रामसेवक उपसरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्यासह सुवर्ण समाजातील लोकांकडून चौकात निळा ध्वज बसविण्यास अडवणूक केली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गावात लावलेले सर्वच ध्वज काढून टाकले. याचा राग मनात धरून सवर्णांनी दलितांवर सामूहिक बहिष्कार टाकला आहे. तर सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक व गावातील सवर्ण समाजातील लोकांनी बैठका घेऊन वादग्रस्त विधाने करून तेथील दलितांवर सामूहिक बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सर्व संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित बांधवांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याद्वारे अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांकडे एका निवेदनाद्वारे दि.३ मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात चौकात निळा ध्वज बसविण्यास सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक व सवर्ण समाजातील लोकांनी अडवणूक केल्यामुळे बेंबळी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सर्व जाती-धर्माचे ध्वज काढून टाकले. त्यामुळे जातीय द्वेष भडकावून सवर्ण समाजातील लोकांच्या धार्मिक भावना भडकावून संबंधित लोकांकडून गावातील किराणा दुकाने व इतर दुकाने दलितांसाठी बंद करुन जयंती व दलित समाजावर बहिष्कार टाकला आहे. 

तसेच जातीय द्वेष भावनेतून दलित समाजाला वेठीस धरून सवर्ण समाजातील लोकांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौकात निळा झेंडा बसवत असल्याचे फोनद्वारे बेंबळी पोलीस स्टेशनला सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावात शांतता राखण्यासाठी सर्व जाती-धर्माचे ध्वज काढून टाकून सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.‌ याचा राग मनात धरून सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक व इतर सवर्ण समाजातील लोकांनी एकत्र येऊन बैठका घेऊन वादग्रस्त विधान करून सवर्ण समाजातील लोकांच्या धार्मिक भावना भडकावून गावातील सर्व दुकाने बंद करून पाणवठे, संसार उपयोगी साहित्य मिळणारी सर्व दुकाने बळजबरीने बंद केली आहेत. त्यामुळे लोकशाहीमध्ये उत्सव साजरा करण्यास, नैसर्गिकरीत्या जीवन जगण्यावर गावातील सामाजिक सलोखा बिघडवून दंगल भडकवण्याचा अप्रत्यक्ष इशारा देऊन दलितांना वेठीस धरले आहे. तर दलित समाजावर बहिष्कार टाकून गावातील सामाजिक तेढ निर्माण करून दंगल भडकवण्याच्या, एकट्यास गाठून मारहाण करण्याच्या धमक्यात देण्यात येत आहेत. 

ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय असून गावात दहशत निर्माण करून दंगल भडकवण्याची धमकी दिल्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. परंतू दलित समाज गप्प असून देखील त्याचा गैरफायदा घेणे सुरू असल्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर लहू खंडागळे, तानाजी खंडागळे, रणजीत खंडागळे, परमेश्वर गवळी, सोमनाथ खंडागळे, ऋतुराज मस्के, पोपट खंडागळे, संदिपान खंडागळे, उषा खंडागळे, बालाजी खंडागळे, गणेश खंडागळे, दिनेश खंडागळे, शैलेंद्र खंडागळे, नामदेव खंडागळे, महादेव खंडागळे, अनिता खंडागळे, विक्रम खंडागळे, अनिता खंडागळे, विशाल खंडागळे, अर्चना खंडागळे, सरोजा खंडागळे, उमेश खंडागळे, संतोष खंडागळे, सीमा खंडागळे, भारत खंडागळे, आम्रपाली खंडागळे, सिंधुताई खंडागळे, सत्यवान खंडागळे, शोभा खंडागळे, मोहन खंडागळे, राजेश खंडागळे, शालुबाई खंडागळे, तुकाराम खंडागळे, बाबुराव खंडागळे, काशिनाथ खंडागळे, दर्शना खंडागळे, वृंदावनी खंडागळे, राजनंदिनी खंडागळे, अभिमन्यू खंडागळे, सुरज खंडागळे, किशोर खंडागळे, हनुमंत गवळी, कल्याण खंडागळे, पल्लवी खंडागळे, द्रोपती खंडागळे, नागनाथ खंडागळे, किरण गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

From around the web