भाजपच्या उमेदवारीसाठी बोराळकर - घुगे यांच्यात चुरस 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 
 
भाजपच्या उमेदवारीसाठी बोराळकर - घुगे यांच्यात चुरस

उस्मानाबाद -  विधान  परिषदेच्या औरंगाबाद ( मराठवाडा ) पदवीधर मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी  झाली असून, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. दुसरीकडे भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसून,  उमेदवारी कुणाला मिळणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 

 औरंगाबाद ( मराठवाडा ) पदवीधर मतदार संघ एकेकाळी भाजपचा गड मानला जात होता, मात्र राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी हा गड उधवस्त केला. आ.सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही, मात्र त्यांनी प्रचार दौरा सुरु केला आहे. 

भाजपकडून अनेकजण इच्छूक असले तरी शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, रमेश पोकळे यांची नावे आघाडीवर आहेत.येत्या दोन दिवसात भाजपचा उमेदवार घोषित होईल, असे सांगितले जात आहे. शिरीष बोराळकर - प्रवीण घुगे यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. 

भाजपची बैठक

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठवाडा पदवीधर नोंदणी प्रमुख शिरीष बोराळकर यांचे प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान भवन येथे मराठवाडा पदवीधर निवडणुकीसंदर्भात प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली.

आगामी पदवीधर निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने सजग राहून कामाला लागावे, पदवीधरांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच कटिबद्ध आहे. सातत्याने ह्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून येत असतो व ह्या वेळेसही भाजपाचा उमदेवारच निवडून येण्यासाठी कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी यांनी कार्यरत रहावे असेही ते म्हणाले.

यावेळी  माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, प्रदीप शिंदे, इंद्रजित देवकते, भाजयुमो अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, दाजीआप्पा पवार, सुजित साळुंके, योगेश जाधव,  नामदेव जाधव, महेश चांदणे, पूजा देडे, पूजा राठोड, मनोज रणखांब, आशिष नायकल, बालाजी गावडे, निलेश शिंदे, प्रवीण पाटील, राहुल शिंदे, दादुस गुंड, अक्षय भालेराव, शरीफ शेख, नाना घाडगे, नानासाहेब कदम, हिम्मत भोसले, निरंजन जगदाळे, अक्षय कांबळे, विशाल कांबळे, रजवी फैसल, काजी वजाहत, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.  

मतदारांना अपेक्षित काम करण्याचा माझा प्रयत्न - आ. सतीश चव्हाण

आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पदवीधर मतदारांची सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला..मतदारांना अपेक्षित  काम करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो असे यावेळी ते म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन टर्ममध्ये अनेक शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या माणसाची जात, पक्ष पाहत नाही असेही यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले. 

यावेळी मा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जीव ओतून प्रयत्न करावे असे आवाहन केलं. तसंच एका विचाराने एका जिद्दीने चव्हाण यांच्या विजयासाठी प्रयत्न करू आणि सर्वाधिक मतांनी चव्हाण यांना निवडून आणू असं, निंबाळकर म्हणाले. यावेळी लोकसभेचे मा. खासदार ओमराजे निंबाळकर, मा. आ. कैलास दादा पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ मार्गदर्शक जीवांरावजी गोरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रजी काळे, उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुरेश बिराजदार, व्यवस्थापन परिषद सदस्य संजयजी निंबाळकर आदी उपस्थित होते. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात  आठ जिल्हे आणि  ७८ तालुके आहेत. मतदान १ डिसेंबर रोजी आहे. त्यात दिवाळी सण आहे. त्यामुळे उमेदवार सर्व ठिकाणी पोहचणार कसा ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

From around the web