मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा सहभागी होणार

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 
मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा सहभागी होणार

उस्मानाबाद - मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई महाविकास आघाडी सरकारने योग्य पद्धतीने हाताळली नाही व आता हे आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले उचलली जातील त्यात भाजपाचा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण मिळवून देण्याचे महत्वाचे काम तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केले होते. योग्य ती घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण दिल्यामुळे मा. उच्च न्यायालयात व तद्नंतर मा. सर्वोच्च न्यायालयात या विरुद्ध याचिका दाखल होवून देखील आरक्षण कायम राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षम हाताळणीमुळे आता आरक्षणा संदर्भात मराठा समाजाला नव्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनामध्ये भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा भाजपाचा निर्धार आहे असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे, त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनांत भाजपचा सक्रीय सहभाग राहील, असे ते म्हणाले. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.

From around the web