औरंगाबाद पदवीधर निवडणूक : अधिकाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य द्यावे

- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

 
औरंगाबाद पदवीधर निवडणूक : अधिकाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य द्यावे

जिल्हयातील 74 मतदान केंद्रावर 33 हजार 632 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

 कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंदावर आरोग्य कर्मचारी,आवश्यक औषधे,मास्क,फेस शील्ड,सॅनेटायझर आणि रुग्णवाहिका उपलब्ध असणार

 उस्मानाबाद -  औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत एकूण 35 उमेदवार उभे आहेत. त्यांना मतदान करणारे मतदार उच्च शिक्षित आणि सुजाण असतात.त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदा-या अत्यंत चोखपणे पार पाडाव्यात. या निवडणुका कोव्हिड-19 च्या महामारीच्या काळात  होत आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार व मतदान अधिकारी यांच्या आरोग्य सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

 औरंगाबाद पदवीधर निवडणूकी्च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कायदा व सुव्यवस्था आणि नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिवेगावकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे व सर्व उपविभागीय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

    पुढे बोलतांना जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 05- औरंगाबाद पदवीधर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जिल्हयातील 74 मतदान केंद्रावर 33 हजार 632 पदवीधर मतदार सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 74 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा संबंधित तहसिलदार, तलाठी यांनी उपलब्ध् करुन दयाव्यात. या सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक् त्या सुविधा उपलब्ध करुन द्यावेत, असे त्यांनी निर्देशित केले.

    जिल्हयातील दिव्यांग मतदार  व 80 वर्षापुढील ज्येष्ठ मतदार यांच्या घरी जाऊन त्यांना मतदान केंद्रावर किंवा घरुन मतदान करण्याची सुविधा असल्याची माहिती दयावी. व जे मतदार घरुन मतदान करणार आहेत त्यांच्याकडून फॉर्म-12 ड भरुन घ्यावा, असे ही दिवेगावकर यांनी सूचित केले. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी करावी. तर घरुन मतदानाची नोंदणी करणाऱ्या दिव्यांग व जेष्ठ मतदार (80 वर्षे पुढील) यांचे मतदान दिनांक 1 डिसेंबर रोजी करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व्हीडीओ चित्रीकरणसह अनुषंगिक कार्यवाही व नोंदी ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

     मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. दिनांक 24 व 25 नोव्हेंबर 2020 रोजी  प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मतदान केंद्रावर एक ही चूक होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले.  यामध्ये कोणाकडून ही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच  कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंदावर आरोग्य कर्मचारी,आवश्यक औषधे,मास्क,फेस शील्ड,सॅनेटायझर आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, असे ही त्यांनी सूचित केले. मतदारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून याचा लाभ मतदारांना होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी व्यक्त केला. 

   तसेच पोलीस विभागाने निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा व प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे पोलीस तैनात करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्या.

   यावेळी जिल्हाधिकारी यांनी पोलिस बंदोबस्त, पोस्टल मतदान, प्रशिक्षण, पार्किंग व्यवस्था, आरोग्य सुविधा, वेब कॉस्टींग, पोलिंग पार्टी डिस्पॅच व रिसीव्हींग,आरोग्य कक्ष,SVEEP कक्ष,STRNG ROOM कोवीडच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना, स्वीप कार्यक्रम आदिंचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

    प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदान संघ निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने झालेल्या तयारीची माहिती दिली. तसेच पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीप अंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती सांगितली

From around the web