तुळजापुरात पुढाऱ्याच्या वाढदिवसाला पोलीस निरीक्षकाची हजेरी
तुळजापूर - तुळजापुरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, दुसरीकडे शहरातील सहारा गौरव कॉलनी मध्ये दि. ६ मे रोजी रात्री आबासाहेब कापसे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला, या वाढदिवसाला पोलीस निरीक्षक एम. ए. तथा मनोजकुमार राठोड हे सर्व नियम धाब्यावर बसवत उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असताना आणि वाढदिवस साजरा करण्यास प्रतिबंध असताना, कापसे यांचा वाढदिवास मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला, सहारा गौरव कॉलनी मध्ये दि. ६ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजता किमान ५० ते ६० लोक उपस्थित होते. या सर्वावर कोरोना संसर्ग कायदा कलम नुसार कारवाई करण्याऐवजी स्वतः पोलीस निरीक्षक एम. ए. राठोड उपस्थित राहून अभिष्टचिंतन केले.यावेळी त्यांनी कापसे यांना बुके देऊन तोंडात पेढा भरवल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सोशल डिस्टिंसिंग पाळले गेले नाही तसेच कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हता, हे विशेष.
लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून जनतेवर गुन्हे दाखल करणारे पोलीस स्वतः मात्र लॉकडाऊनचे नियम मोडत असल्याने तुळजापुरात संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पुढाऱ्यांना सूट तर सर्वसामान्य नागिरकांना वेठीस धरले जात असल्याने लॉकडाऊनच्या नियमाचे तीन तेरा वाजले आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारचा कायद्याची पायमल्ली होत असल्याने सामान्य जनतेने कुणाकडे पाहावे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस निरीक्षक एम. ए. तथा मनोजकुमार राठोड हे तुळजापुरात रुजू झाल्यापासून अवैध धंद्याला पेव फुटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. ते राजकीय पुढाऱ्यांच्या ददबावाखाली काम करीत असल्याचे यातून सिद्ध होत असून, याप्रकरणी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक एम. ए. राठोड यांच्यावर काय कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.