कळंब शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिजित लोंढे यांना मारहाण
कळंब : शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिजित लोंढे यांना मारहाण यांना माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने किरकोळ कारणावरून मारहाण केली. या भ्याड हल्ल्याचा शहरात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत शहरातील हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय खासगी डॉक्टरांनी घेतला आहे.
कळंब शहरातील शासकीय लसीकरण केंद्र हे विजया नर्सिंग होम म्हणजेच डॉक्टर लोंढे यांच्या रुग्णालयात सुरू आहे. त्यामुळे या रुग्णालयात लस घेण्यासाठी मोठी गर्दी होते. म्हणून रुग्णालयाच्या समोरील भागात गाड्या लावण्यासाठी जागा अपुरी पडते.लोंढे यांच्या रुग्णालयासमोर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचे निवासस्थान आहे. कल्पना नरहिरे यांचा पुतण्या बालाजी नरहिरे याने आमच्या घरासमोर गाड्या का लावतात म्हणून रुग्णालयाच्या बाहेर शिवीगाळ करायला सुरुवात केली.
कश्यामुळे गोंधळ सुरू आहे, हे पाहण्यासाठी डॉ. अभिजित लोंढे हे बाहेर आले आणि आम्हाला का शिवीगाळ करत आहे, असा जाब नरहिरे यांना विचारला असता बालाजी नरहिरे याने माझी कॉलर धरून मारहाण करायला सुरुवात केली, अशी माहिती स्वतः डॉ. अभिजित लोंढे दिली.
कळंब शहरातील डॉ अभिजित लोंढे यांना मारहाण pic.twitter.com/nyl72ATabJ
— Osmanabad Live (@dhepesm) June 12, 2021
डॉ.अभिजित लोंढे हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांचे सुपुत्र आहेत. असोसिएशनच्यावतीने या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कळंब पोलिसात तक्रार दाखल करण्याची रितसर प्रक्रिया सुरू आहे. आयएमएचे पदाधिकारी डॉक्टर मंडळी देखील कळंब पोलिसात दाखल झाले आहेत. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकही डॉक्टर रुग्णालय उघडणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतलीय.