ड्रॅगन फळपीकाच्या अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 
s

  उस्मानाबाद  -   ड्रॅगनफ्रुट (कमलम) हे एक निवडूंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सीडंटमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिध्दी मिळत आहे. या फळपीकाच्या लागवडीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरीक्त या पळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पीकाला रोग व कीडींचा प्रादुर्भाव नगण्य आहे. या पीकाच्या संरक्षणावर जास्त खचं येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पीकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य इ.बाबी लक्षात घेवून 2021-22 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.

ड्रॅगनफ्रुट फळपीकाची लागवड करण्यासाठी जमीनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी. X 3 मी., 3 मी. x 2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. या सिमेंट काँक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते आणि पीक संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय आहे. याकरिता 4 लाख रुपये प्रती  हेक्टर प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून 40 टक्के प्रमाणे रक्कम 1 लाख 60 हजार प्रती हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जीवंत असणे अनिवार्य राहील.

ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in  वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले आहे.

From around the web