११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन

उस्मानाबाद जिल्ह्यात बंद यशस्वी करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आवाहन 
 
sd

उस्मानाबाद - केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तयार केलेले तीन काळे कायदे रद्द करावे व एमएसपी यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे लोकशाही पद्धतीने व अत्यंत शांततेने शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रात सत्तेवर असलेल्या बेबंद व हिटलरशाही सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडून ठार केले आहे. हिटलरला देखील लाजवेल अशा पद्धतीने या सरकारचा कारभार सुरू आहे. त्यामुळे देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व त्या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन आघाडी सरकारने केले आहे.

 एक दिवस बळीराजा व अन्नदात्यासाठी पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व जनतेने सहभागी होऊन समर्थन द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर  , काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विजय सस्ते यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जिल्हावासियांना केले आहे. दरम्यान, या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय निंबाळकर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे व नितीन राऊत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दुधगावकर म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, एमएसपी देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांचे शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने या आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अत्यंत क्रूर व निर्दयपणे वाहन चालवून त्यांना चिरडून ठार केले आहे. ही अत्यंत चीड आणणारी व हिटलरशाही शाहीलाही लाजवणारी घटना आहे.

 मात्र सरकारने अजूनही त्या आरोपीला अटक केली नाही. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून देशात सुरु असलेली बेबंदशाही रोखण्यासाठी या बंदला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी समर्थन द्यावे, असे आवाहन केले. तर शेरखाने म्हणाले की, शेतकऱ्यांना चिरडून ठार करणे ही घटना अत्यंत निर्दयी घटना असून या घटनेवरून केंद्र सरकारची हिटलरशाही दिसून आली आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यापारी, ग्रामस्थ व नागरिकांनी आयोजित करण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच विजय सस्ते यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या  आंदोलनात शेतकऱ्याच्या अंगावर वाहन घालून चिरडून ठार केले आहे. त्यामुळे देशातील सत्ताधार्‍यांनी जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला चिरडल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ हा बंद आहे. त्यामुळे या बंदला सर्वांनी समर्थन देऊन हा बंद यशस्वी करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

From around the web