जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरचे आणखी एक पाऊल

प्राचीन तिर्थकुंड, चैत्यगृहासाठी सात कोटी ३३ लाख मंजूर

 
d
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव  - जगाच्या नकाशावर हजारो वर्षापासून आपला सक्षम वारसा मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या तगर म्हणजेच तेर नगरीचे आणखी एक पाऊल जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने झेपावले आहे. प्राचीन स्थापत्यशास्त्रकला आणि ऐतिहासिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण तसेच अनन्यसाधारण महत्व असलेल्या तेर येथील तिर्थकुंड व चैत्यगृहाचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने सात कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करू पाहणारी जागतिक वारसा स्थळांची मोठी देणगी तेर नगरीला लाभलेली आहे. जागतिक पातळीवरील याच प्राचीन वारसास्थळांना आता नवी झळाळी लाभणार आहे. हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या तेर येथील स्मारकांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. जागतिक पातळीवर तगर म्हणजेच तेर नागरीचा समृद्ध व वैभवशाली इतिहास पोहोचविण्यासाठी या स्थळांना जागतिक वारसा स्थळांप्रमाणे विकसित केले जाणार आहे. स्थापत्याशास्त्र व ऐतिहासिक दृष्ट्या अनमोल असणारी प्राचीन स्मारके तेरे येथे आहेत. त्यापैकीच प्राचीन तीर्थकुंड व चैत्यगृहाच्या जतन, संवर्धन व विकासासाठी ७ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामाध्यमातून तेरला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

एकेकाळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्गावरील प्रमुख व्यापारी केंद्र राहिलेल्या तेर या गावाला धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा मोठा सक्षम वारसा लाभलेला आहे. दीड हजार वर्षांपेक्षाही अधिक प्राचीन वारसा असलेली त्रिविक्रम मंदिर, तीर्थकुंड, चैत्यगृह (स्तूप) ही जागतिक दर्जाची  स्मारके आहेत. काळाच्या ओघात या सर्व स्मारकांची दुरवस्था झाली आहे. पुन्हा एकदा या प्राचीन स्मरकांना गतवैभवाची झळाळी देऊन जगभरातील पर्यटकांसमोर मांडणे गरजेचे आहे.  त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्रिविक्रम मंदिरासाठी जून महिन्यात २ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. आता तीर्थकुंड व चैत्यगृहाच्या विकासासाठी अनुक्रमे ५ कोटी ११ लाख व २ कोटी २१ लाख असे एकूण ७ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुराण वस्तुसंग्रहालय

जागतिक पर्यटन केंद्राच्या क्षमता असलेल्या तेरच्या विकासावर सातत्याने काम सुरू आहे. जागतिक दर्जाच्या पुराण वस्तुसंग्रहालयाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मागील वर्षी त्यासाठी चार कोटी २० लाख रुपये, तर यंदा ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तेरचा समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर ठळकपणे सादर करण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

 
 

From around the web