कळंबमध्ये आणखी एकाचा खून
एकाच कुटुंबातील आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
कळंब - कळंब शहरात पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. शहरातील गांधीनगर भागात बुधवारी सायंकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते, पैकी एकाचा मृत्यू झाल्याने या भागात तणावाचे वातावरण पसरले आहे.
गांधीनगर भागात मागील भांडणाचा राग मनात धरून ८ ते १० जणांनी दोघांना लोखंडी रॉड, लाठ्या - काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात महेबूब शेख आणि हुजेब शेख हे गंभीर जखमी झाले होते. उपचारार्थ दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हुजेब शेख याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर महेबूब शेख याच्या डोक्याला मार लागला होता. त्याला पुढील उपचारासाठी उस्मानाबादला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान , या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे शहरातील काही भागात तणावाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी आडत दुकानात काम करणाऱ्या वॉचमनचा खून झाला होता, त्याची शाई वाळते न वाळते तोच आणखी एकाचा खून झाला आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक संपला की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकाच कुटुंबातील आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
महेबूब शेख खून याप्रकरणी आरेफ उर्फ हुसेन शेख यांनी कळंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एकाच कुटुंबातील आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल धोकटे, राहुल धोकटे , विजय धोकटे , सुनील धोकटे , संदीप धोकटे , विलास धोकटे , मयूर धोकटे , ओंकार धोकटे यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३२६,१४७,१४८,१४९, ५०४ नुसार गुन्हा करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करीत आहेत.