अणदूर – नळदुर्गच्या श्री खंडोबा मंदिरात ‘नो मास्क , नो एन्ट्री’ ...  

 
s

नळदुर्ग :  अणदूर – नळदुर्गचे श्री खंडोबा दैवत असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे, सध्या मंदिर सकाळी सात ते रात्री सात पर्यंत भाविकांसाठी खुले असले तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ‘ नो मास्क , नो एन्ट्री ‘ असा फलक अणदूर आणि नळदुर्गच्या मंदिरात लावण्यात आला आहे. 

उस्मानाबाद  जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियमावली जाहीर केली आहे. प्रशासनाच्या आदेशावरून अणदूर – नळदुर्गच्या श्री खंडोबा मंदिर समितीने नियमावली जाहीर केली आहे. 

पाच वर्षाच्या आतील आणि साठ वर्षाच्या नंतरच्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असणे बंधनकारक आहे. 

d

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज मंदिराची स्वच्छता केली जात आहे. तसेच दिवसातून तीन वेळा सॅनिटायझरने फवारणी करण्यत येत आहे. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

तीन दिवस दर्शन बंद 

नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा दि. १६ ते १८ जानेवारी रोजी होणार होती. मात्र ही महायात्रा कोरोना संसर्गमुळे रद्द करण्यात आली असून , या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी राहणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन बंद राहणार आहे. त्यानंतर १९ जानेवारी पासून पुन्हा  दर्शन पुन्हा सुरु राहणार आहे, मात्र भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे, लागणार आहे. 

प्रमुख मानकऱ्याच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी 

१७ जानेवारी रोजी पौष पोर्णिमा आहे, या दिवशी नळदुर्गच्या श्री खंडोबा मंदिरात  सर्व धार्मिक विधी अणदूर आणि नळदुर्गच्या प्रमुख मानकऱ्याच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत. तसेच रात्री अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्यांचे आगमन होणार आहे, त्यानंतर मोजक्या पुजारी आणि मानकऱ्याच्या उपस्थितीमध्ये छबिना निघणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. 

२५ जानेवारी रोजी श्री खंडोबाचे अणदूरला प्रस्थान 

श्री खंडोबाचा नळदुर्गचा मुक्काम २५ जानेवारी रोजी संपणार आहे. या दिवशी मध्यरात्री श्री खंडोबाचे नळदुर्गहून अणदूरला प्रस्थान होणार आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता श्री खंडोबाचे अणदूर मंदिरात आगमन होणार आहे. 

From around the web