….अन्,जिल्हाधिकारी जि.प. मध्ये येताच बैठकीचा नूर बदलला

 
….अन्,जिल्हाधिकारी जि.प. मध्ये येताच बैठकीचा नूर बदलला

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी सहसा जिल्हा परिषदेत जात नाहीत. बहुतेक बैठका जिल्हाधिकारी कार्यालयातच होतात. त्या बैठकांना जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित असतात. पण आज अचानक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येथील जि.प.च्या कार्यालयास भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड हे त्यांच्या दालनात विभाग प्रमुखांची बैठक घेत होते. तेथे .दिवेगावकर यांचा प्रवेश होताच त्या बैठकीचा नूरच बदलला.

        माझी ही सदिच्छा भेट आहे. आपली बैठक सुरू आहेच तर आपण काही विषयांवर औपचारिक चर्चा करू म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील तनाव कमी केला. त्यानंतर बैठकीत जिल्हयातील विविध विषयांवर अधिकारी मत व्यक्त करत होते. जिल्हाधिकारी त्यात भर घालत, पुष्टी देत तस तसे बैठकीस  नकळतपणे जिल्हयाच्या  आणि जिल्हयातील गावांच्या विकासाचा जणू अजंडाच तयार होत गेला,  औपचारिक बैठकीचे स्वरूप जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सहजपणे विकासाच्या बैठकीत रुपातंरीत केले.

        जिल्हयातील विविध शासकीय विभागांतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती संकलीत करणे, त्यांची एक पुस्तिका तयार करून वाटप करणे, वसुंधरा योजनेतील जिल्हयातील सात गावातील कामांना गती देणे, एक हजारपर्यंत लोकवस्ती असलेल्या जिल्हयातील आठ तालुक्यातील प्रत्येकी दोन या प्रमाणे सोळा गावांची यादी तयार करून त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा आराखडा तयार करून तो त्या गावात राबविणे. या सोळा गावांची निवड करताना सातत्याने टंचाई आणि शेतकरी आत्महत्या झालेल्या गावांना प्राधान्य देणे, जिल्हयातील सर्व गावांतील सुविधा, अडचणी, दुरूस्ती आणि इतर विकास कामं करण्याबाबत ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांच्या मदतीने गावाच्या विकासाचा ग्रामविकास आराखडा तयार करणे, जागा निश्चित करून मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे, इतरही ठिकाणी वृक्षरोपणांचा कार्यक्रम राबविणे,चारा-वैरण लागवडीवर भर देणे,जलसंधारणासाठी सीसीटी वर भर देणे,टंचाई ग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहिर खोदणे, दिव्यगांचे सर्वेक्षण करून, त्याची यादी करून त्यांना योजनांचा लाभ देणे, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे बचतगट तयार करून त्यांना मदत करणे, तेर येथे संत गोरोबा काकाच्या मंदीर परिसरात सुविधा निर्माण करण्याबरोबरच पैठण येथील  ‘घाटा’ प्रमाणे घाट बांधणे,फेराफार अदालती घेऊन  शेतीच्या फेर फाराला गती देणे, जिल्हयातील संरक्षित स्मारकाची माहिती संकलित करून त्याचे कॉफी टेबल बुक तयार करणे ,शिवार फेरीचा उपक्रम राबविणे, शेत रस्त्यांची कामं नियोजित  वेळेत पूर्ण करणे, जंगली प्राण्यासाठी पाणवटे तयार करणे यासह अनेक विषयांवर चर्चा होवून या कामांना गती देण्याचा मनोदयही सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे व्यक्त केला.

या बैठकीस जि.प.तील सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यात अतिरिक्त मुख्यकार्यकारी  अधिकारी ए.जी.नेवाळे, मुख्य लेखा वित्त अधिकारी एस.जी.केंद्रे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री डॉ.एस.डी.तुबाकले(सामान्य प्रशासन) ,एन.एस.दाताळ (ग्रामपंचायत), डी.एच.निपाणीकर  (महिला व बालविकास), अनंद कुंभार (पाणी व स्वच्छता) ए.बी.माहेरे (शिक्षणधिकारी प्राथमिक),जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे आदीचा समावेश होता.

From around the web