नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी वाढीव 10 कोटी मंजूर
उस्मानाबाद - नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या उर्वरित बांधकामासाठी आवश्यक निधीचा शासन निर्णय निर्गमित झाला असून रुग्णालयाची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या रू ३१.९५ कोटी किमतीच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण होऊन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित विषय मार्गी लावल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना डॉ तानाजी सावंत यांचे आ .राणाजगजितसिंह पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक वेळा मागणी करूनही पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. मात्र महायुती सरकार सत्तेत येताच धाराशिव जिल्ह्यासाठी निधीचा ओघ सुरु झाला आहे. रेल्वे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासारखे अनेक दिवसापासूनचे प्रलंबित विषय मार्गी लागले आहेत.
नळदुर्ग येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी यापूर्वी रुपये २१.८२ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र आयपीएचएस निकषांनुसार आरोग्य विभागाकडून प्राप्त नकाशे व त्यानुसार कामांच्या व्याप्ती मध्ये झालेली वाढ, शव विच्छेदन गृह व स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह इमारत यासह आवश्यक वाढीव कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती आ .राणाजगजितसिंह पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. डॉ. तानाजी सावंत साहेब यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने रुपये ३१.९५ इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे आता रुग्णालयाचे उर्वरित बांधकाम लवकरच पूर्ण होऊन नळदुर्ग व परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, असे आ .राणाजगजितसिंह पाटील म्हटले आहे.