अवैध वाळू साठा व ट्रकवर उस्मानाबाद तहसीलकडून कारवाई
उस्मानाबाद शहरालगत असणा-या सांजा रोड येथे आज तापी (गुजरात) येथून आलेल्या तीन ट्रक वाहना (क्रंमाक MH 21AU1481,MH 12 FZ 9407 MH 04 HD 1429) मध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आले.संबंधित ट्रक चालकास शासकीय पावतीबाबत विचारणा केली असता संबंधिताने पावती सादर केली परंतु त्यावर खरेदीदाराचे नाव किंवा ग्राहकांचे नाव दिसून आले नाही. तसेच सांजा रोडलगत सार्वजनिक ठिकाणी कोणताही शासकीय परवाना नसताना तेथे अंदाजे 40 ब्रास वाळू साठा व ट्रक मध्ये अंदाजे 15 ब्रास असे एकूण 55 ब्रास त्यांची अंदाजे बाजारभाव प्रमाणे किंमत पंधरा लाख आहे.
तेथील वाळू व इतर गौण खनिज साठयाचा पंचनामा करुन तहसील कार्यालयाच्या परिसरात घेऊन जाण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दोन ट्रक शहर पोलीस स्टेशन आणि एक ट्रक आनंदनगर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्याची कारवाई सुरू आहे.उस्मानाबाद तहसील कार्यालयात सध्या अवैध गौणखनिज पथक गठीत करुन कारवाई करण्यात येत आहे. आज येथील तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री. देशपांडे, श्री. चिरखे, श्री. काळे व तलाठी श्री समाधान जावळे,श्री. अमोल निरफळ, श्री. रोडगे, श्री. बालाजी लाकाळ,श्री गुजर श्री कानाडे ,श्री आखाडे वाहन चालक श्री जमादार यांच्या पथकानी ही कारवाई केली.
तहसीलदाराकडून मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण
कारवाई दरम्यान बघ्याची गर्दी झाली होती. यावेळी मनसेचे माजी पदाधिकारी अभिजित पतंगे हेही थांबले होते. यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी लोकांना गर्दी करू नये, येथून निघून जावे असे आवाहन केले असता, मनसेचे माजी पदाधिकारी अभिजीत पतंगे तेथेच उभारले असता, तहसीलदार गणेश माळी हे तुला कळत नाही का ? असे म्हणून आई - बहिणीवर शिवीगाळ केली तसेच दोन ते तीन गालावर, पाठीवर चापटा लगावून शासकीय गाडीत बसवले आणि शहर पोलीस स्टेशनला नेले. त्यानंतर पतंगे याच्यावर कोव्हीड - १९ अंतगर्त कलम १८८ नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून सोडून देण्यात आले.
पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घेतली नसून सोमवारी आपण तहसीलदार गणेश माळी यांच्याविरुद्ध कोर्टात खासगी फिर्याद दाखल करणार असल्याचे अभिजित पतंगे याने सांगितले.
याबाबत गणेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता, पतंगे यांनी आपणाबरोबर हुज्जत घातल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले. शिवीगाळ करायला नको होती, पण रागाच्या भरात घडले, त्याबद्दल दिलगीर आहे, असेही ते म्हणाले.
मारहाणीचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज किंवा उस्मानाबाद लाइव्ह ट्यूटरवर पाहा
https://www.facebook.com/osmanabadlive