धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज बोर्डे यांना अद्याप अटक नाही 

आनंदनगर पोलीसांच्या तपासावर संशय  
 
s
कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी 

धाराशिव - धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून १५ दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे यांना अद्याप अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोर्डे आणि आनंदनगर पोलीस यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

धाराशिव नगर पालिकेतील कोट्यवधी रुपयाच्या घोटाळा प्रकरणी  न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल )  आणि प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. 

 सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल यांनी अटकपूर्व जामीन  मिळावा म्हणून  धाराशिव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज २० ऑगस्ट रोजी नामंजूर केला आहे. त्यानंतर प्रशांत विक्रम पवार यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून १५ दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे आणि पवार यांना अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

आनंदनगर पोलीस बोर्डे आणि पवार यांना अटक करण्यास चालढकल करीत असून, आनंदनगर पोलीस आणि बोर्डे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 


काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद उस्मानाबाद येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या  अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उस्मानाबाद हा. मु. रा. समर्थ नगर उस्मानाबाद यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

पोलीस थंड 

धाराशिव नगर पालिकेतील कोट्यवधी रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग न करता, आनंदनगर पोलिसांकडे देण्यात आले आहे. आनंदनगर पोलीस  सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल )  आणि प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना अटक करीत नाहीत. याबाबत विचारले असता, पोलीस निरीक्षक बांगर हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे कुठं तरी पाणी मुरत असून, आनंदनगर पोलीसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. 

भाजप आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यावर आजवर सात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु पोलीस आरोपीना पाठीशी घालत असल्याने धस चांगलेच संतापले आहेत. 


 

From around the web