गर्भपात करणारी टोळी सक्रिय ! दलालाच्या डायरीत बड्या डॉक्टरांचे नंबर ... 

धाराशिव पोलीस बड्या धेंडयावर कारवाई करणार का ? 
 
as

धाराशिव  - . भ्रूण हत्येबंदी असताना देखील कर्नाटकातील गुलबर्गा येथील गर्भपात करणाऱ्यांमध्ये सराईत असलेल्या डॉक्टरकडे गर्भवती महिलांना घेऊन जाणाऱ्या दलालास रंगेहात पकडून जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे हे रॅकेट मोठे असून यामध्ये धाराशिव शहरातील बड्या हस्तींसह आरोग्य विभागातील काही कर्मचारी सामील झाले असल्याचा खळबळजनक खुलासा गर्भ धारणापूर्व व प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध अर्थात पीसीएनडीटी जिल्हा समितीचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.६ एप्रिल रोजी केला.मुलगी नको मुलगाच हवा या हव्यासापोटी अनेक जण गर्भवती महिलांच्या पोटात असलेल्या बालीकेच्या कळ्याच खुडण्याचे अत्यंत दुर्दैवी चित्र सुरू आहे

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक तथा गर्भ धारणापूर्व व प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध जिल्हा समितीचे सचिव राजाभाऊ गलांडे, कायदेशीर सल्लागार ॲड रेणुका शेटे, डॉ आळंगेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ खुने म्हणाले की, स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे जिल्ह्यात प्रमाण वाढले असून अनेक महिला यासाठी दलाल म्हणून काम करत आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील काहीजणांचा सहभाग आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला गर्भ लिंग निदान करुन गर्भ खाली करण्यासाठी जिल्ह्यातून उमरगा मार्गे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील डॉ गुरुराज कुलकर्णी याच्याकडे अशा ४ महिलांना खुद्दरा कादरी रा. निलंगा (५३ वर्षे) ता. निलंगा जि. लातूर हा दलाल दि.५ एप्रिल रोजी उमरगा चौरस्ता येथून घेऊन जाण्यासाठी आला होता. 

या ४ महिलांमध्ये उस्मानाबाद येथील पीसीएनडीटी पथकाने एका डमी गर्भवती ग्राहकाचा त्यामध्ये समावेश केला होता. त्यासाठी २० हजार रुपयांच्या नोटा त्याला दिल्या होत्या. त्याने पूर्वी गर्भ खाली करण्यासाठी जाण्याचे ठरलेले ठिकाण बदलले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. तर त्याच्याकडून दिलेल्या त्या नंबरच्या नोटा, मोबाईल व इतर काही चिठ्ठ्या असे साहित्य हस्तगत केले आहे. या मोबाईल व चिठ्ठीत डॉ गुरुराज कुलकर्णी यांच्यासह इतर डॉक्टर व संबंधितांची नावे पुढे आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये उस्मानाबाद शहरातील नामांकित मंडळीचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. या दलालाने जिल्ह्यामध्ये अनेक सहाय्यक दलाल तयार केले आहेत. या दलाला मध्ये महिलांचा मोठा समावेश असून यामध्ये आरोग्य विभागा अंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांचा मोठा समावेश असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणी उमरगा न्यायालयात कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 


गर्भ लिंग निदान चाचणी करून भ्रूण हत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे रोखण्यासाठी शासन वेगवेगळे प्रयत्न करीत आहे. मात्र समाजातील सगळेच व सुज्ञ नागरिकांनी सामाजिक भान व जबाबदारी ओळखून आपल्या गावात किंवा परिसरात एखाद्या महिलेचे गर्भलिंग निदान होत असेल किंवा गर्भपात होण्याची शक्यता असेल तर त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ यावर संपर्क साधावा. माहिती दिलेल्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुपित ठेवले जाते. हे प्रकरण तडीस मेल्यानंतर संबंधित व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जात असल्यामुळे खबर यांनी पुढे यावे असे आवाहन ऍड. रेणुका शेटे यांनी केले. 


मुलगी नको मुलगाच हवा या अट्टहासापायी अनेकांनी खूप मोठा गैरसमज निर्माण करुन घेतला आहे. त्यामुळे गर्भात वाढणारे मुल आहे की मुलगी हे तपासून पाहण्यासाठी स्पर्धाच लागलेली आहे. ते तपासण्यासाठी व भ्रूणहत्या करण्यावर शासनाने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. अशी असताना अवैधरित्या गर्भपात कुठे, कसा व त्यासाठी किती रक्कम मोजावी लागते ? याची संबंधित कुटुंबापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी महिला दलाल मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे भ्रूणहत्या संबंधित गर्भवती महिलेच्या कुटुंबातील सदस्य व डॉक्टर यांच्या सहमतीने व दलाल महिलेच्या मध्यस्थीने होत असल्यामुळे महिलाच महिलांचा काटा काढायला लागल्या असल्याचा दावा पीसीएनडीटी नोडल अधिकारी डॉ दत्तात्रय खुने यांनी केला.


जिल्ह्यात १११ सोनाग्राफी तपासणी केंद्रापैकी ९८ केंद्र कार्यरत आहेत. तर ५४ गर्भपात केंद्र मान्यता प्राप्त आहेत. या केंद्रामध्ये १२ आठवड्यांच्या आतील गर्भ सुरक्षित गर्भपात करण्यास परवानगी आहे. तसेच २० वीस आठवड्यापर्यंतचा गर्भपात करण्यास २ केंद्रांना मान्यता असून त्यासाठी समितीची मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे डॉ खुने यांनी सांगितले. दरम्यान, या केंद्रांची जर तीन महिन्याला आरोग्य विभागाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्या तर संबंधित केंद्रास नोटीस देऊन त्याचा खुलासा मागविला जातो. जर समाधान कार्ड खुलासा न आल्यास त्याच्यावरती कारवाई केली जात असल्याचे डॉ खुने यांनी सांगितले.

मागील काही महिन्यापूर्वी पीसीएनडीटी पथकाने गुलबर्गा येथे जाऊन डॉ गुरुराज कुलकर्णी यांना गर्भपात करताना रंगेहात पकडून त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो सध्या जामीन वर असून तो पुन्हा असलेच उद्योग करीत असल्यामुळे तो सराईत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधितावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

.................................................................


त्या बड्या हस्ती कोण, समोर येणार ?

दलाल कादरी याच्याकडील मोबाईल, चिट्ठी व इतर साहित्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या हत्तीचे महत्वाचे धागेदोरे आरोग्य विभागाच्या हाती लागले आहेत. मात्र आरोग्य विभाग त्यांच्यावर कारवाई करून त्यांना नागवे करणार की त्यांची अंधारात कंदुरी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

From around the web