दसरानिमित्त धुणे धुवायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू
पाडोळी - दसरानिमित्त धुणे धुवायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी ( बेंबळी ) येथे आज मंगळवारी ( दि.५ ) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. तानाजी कडाप्पा कांबळे (वय १९) असे या मृत युवकाचे नाव आहे.
टाकळी ( बेंबळी ) गावातील कांबळे कुटुंब शिवारातील फॉरेस्ट जवळील पाणी साचलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ( खाणीत) दसरा सणानिमित्त धुणे धुवायला गेले होते. यावेळी तानाजी कांबळे यांचे आई वडील आणि मोठा भाऊ लखन धुणे धूत होते. त्याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तानाजी यांचा भाऊ लखन धुणे धुण्याचा नादात पाण्यात बुडाला तेव्हा लखन याला वाचवण्यासाठी वडील कडाप्पा कांबळे पाण्यात उतरले,.
तेव्हा तानाजी धुणे वाळवण्यासाठी दूर गेला होता. जेव्हा त्याला आपला भाऊ बुडत असल्याचे आणि वडील वाचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले, तेव्हा भयभीत होऊन तानाजी याने वडीलाकडे धाव घेतली, याच दरम्यान तानाजी याचा खाणीच्या (खदान) काटावरून पाय घसरला. हे त्याचे वडील कडाप्पा कांबळे यांच्या लक्षात येईपर्यंत तानाजीने पाण्याचा तळ गाठला.
त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तानाजी याचा पाण्यात बुडून मृत्यू दुर्दैवी झाला. यावेळी गावातील काही तरुणांनी तानाजी याचा दीड तास पाण्यात शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे टाकळी ( बेंबळी ) हळहळ व्यक्त केली जात आहे.