उस्मानाबादेत लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार
उस्मानाबाद - लहान मुलांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांच्यावर व्यवस्थितरित्या उपचार करता यावेत. यासाठी खास स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.१९ मे रोजी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत लहान मुले पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या टास्क फोर्स मार्फत लहान मुलांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना दोन दिवसात निर्गमित कराव्यात. जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ञ यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र अशी सोय करावी. तसेच त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, खासगी रुग्णालयापैकी दोन रुग्णालयांनी त्यांच्याकडे सुसज्ज व्यवस्था, बाल रोग तज्ञ उपलब्ध असल्याने लहान मुलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल म्हणून काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे बालरोग तज्ञांच्या उस्मानाबाद येथील संघटनेस तालुकानिहाय रुग्णालयांना आवाहन करण्याबाबत सूचित करण्यात आले.
या रुग्णालयांना डेडिकेटेड चिल्ड्रन्स फॅसिलिटी म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा होम आयसोलेशनमधील लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या लहान मुलांसाठी विशेष औषधोपचार निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कोरोनाची लक्षणे असणार्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या अल्पवयीन रुग्णांचे प्रमाण ९०- ९५ टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डॉ. अभय शहापूरकर, डॉ. संजय सोनटक्के, डॉ. प्रसाद धर्म व डॉ. सुधीर मुळे, डॉ. श्रीनिवास हंबीरे व व्ही.एल. गवळी आदी उपस्थित होते.
Video