कसबे-तडवळे येथे भव्य स्मारक उभारणार : संजय बनसोडे

 
sd

उस्मानाबाद -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या   कसबे - तडवळे येथील जि प प्राथमिक  शाळेच्या  जागेतच उभारण्यात येईल .  राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या स्मारकाच्या   जागेचा प्रश्न  तात्काळ  निकाली काढण्यात येईल .येथे भव्य स्वरूपात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे  स्मारक साकारण्यात येईल . या स्मारकाच्या विकासासाठी  निधी कमी  पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे  सार्वजनिक  बांधकाम , भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज कसबे तडवडे  येथे केले .

            गेल्या काही दिवसापासून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाच्या जागेचा प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे. त्या प्रस्तावाची माहिती घेवून तात्काळ मंत्रालयात संबंधित विभागांचे मंत्री , सचिव यांची बैठक घेऊन जागेचा प्रश्न  निकाली काढण्यात येईल,असे सांगून श्री.बनसोडे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला  ऐतिहासिक महत्व आहे .त्यामुळे येथे  भव्य दिव्य स्मारक उभे  करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शाळेतील ज्या रुममध्ये  बाबासाहेब थांबले होते, त्या रूमचे बांधकाम जैसे थे ठेऊन त्याच परिसरात हे स्मारक साकारण्यात येणार आहे. पण या शाळेत सध्या पाचशेच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणातही खंड पडू नये याचाही विचार करून शाळेसाठी जागा बघितल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्थाव मंत्रालयात पाठवला आहे . उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठराव घेऊन शाळेची जागा स्मारकास देण्याचा ठराव घेतला आहे.तेंव्हा या जागेचा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

         श्री . बनसोडे यांनी कसबे-तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट देऊन त्यांच्या स्मृतीस या वेळी अभिवादनही केले . त्यानंतर श्री . बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

       यावेळी आमदार विक्रम काळे, एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, माजी आमदार राहुल मोटे ,  राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे ,  समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी. जी. अरवत, तहसीलदार गणेश माळी,  कसबे तडवळे येथील सरपंच किरण औटे आदी  उपस्थित होते.

From around the web