पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केल्यास एक हजाराचा दंड 

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 एप्रिलपर्यंत वाढवला        
 
पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केल्यास एक हजाराचा दंड
अनेक कडक निर्बधांचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश जारी    

उस्मानाबाद -   उस्मानाबाद जिल्ह्यात  दिवसेन दिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून  जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी 15 एप्रिल 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे . तसेच 29 मार्च 2021 पासून जिल्ह्यातील शाळा , महावयद्यालय , खेळाची मैदाने , बागा , केवळ चहा विकणारी हॉटेल -- टपऱ्या , पान टपऱ्या आदी पूर्णपणे बंद असणार आहेत .  या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जारी केले आहेत . 

उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक आदेश काढले असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केल्यास १ हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरासह इतर सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे ही दर रविवारी बंद राहणार असून सकाळी ७ ते सांयकाळी ७ पर्यंत १२ तासासाठी धार्मिक स्थळे सुरु राहतील . कोरोनाचा वाढत प्रभाव व गर्दी रोखण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आता दररोज फक्त ५ हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार असून मंदिरात विनामास्क प्रवेश असणार नाही . केवळ ५ जणांना धार्मिक विधीसाठी उपस्थित राहता येणार आहे तर भाविकांनी शक्यतो ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे .

राज्य शासनाने 27 मार्च 2021 च्या आदेशाद्वारे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी 15 एप्रिल 2021 पर्यंत वाढवण्यास सांगितले आहे .त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973  च्या कलम 144 मधील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी  प जिल्ह्यातील करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनचा कालावधी  वाढविला आहे .  त्याचबतोबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या  आदेशातील  मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात  लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे , असेही या आदेशात जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे .          

   जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पुढीलप्रमाणे निर्बध लागू करण्याची कार्यवाही करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत . ते असे ---

1 ) कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे .
 
2 ) जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येईल त्याठिकाणी CONTAINMENT ZONE जाहीर करण्याचे अधिकार संबंधित उपविभागाचे INCIDENT COMMANDER म्हणून उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता राहतील. संबंधित उपविभागीय अधिकारी हे केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशांनुसार CONTAINMENT ZONE चे क्षेत्र, कालावधी आणि  त्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत वेगळा आदेश काढून त्याबाबत सर्वांना सूचित करतील. CONTAINMENT ZONE मध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सर्व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तसेच त्यांचा शोध, ओळख पटविणे, विलगीकरण करणे तसेच  सतत 14 दिवसांपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे . 72 तासांचे आत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 80 टक्के व्यक्तींची शोधमोहिम पूर्ण होणे आवश्यक असणार आहे . 


3)     एका ठिकाणी  पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. याचे उल्लंघन करणा-या प्रत्येक व्यक्तीस  1000 रुपये  इतका दंड आकारण्यात येईल. 
4 )     ज्याठिकाणी फक्त चहा विकला जातो अशी सर्व चहाची दुकाने पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. 
5)     पान, तंबाखू, सिगारेट आदी   वस्तुंची  विक्री करणा-या पानटप-या पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. 6 ) सर्व शाळा, महाविद्यालये , खाजगी कोचिंग क्लासेस , शिकवण्या , प्रशिक्षण संस्था,  वसतीगृहे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. ऑनलाईन  , दूरस्थ शिक्षण पद्धतीला परवानगी सुरू राहील तसेच या पद्धतीस प्रोत्साहन देण्यात यावे.
7 ) जिल्ह्यातील सर्व खेळाची मैदाने, क्रीडांगणे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगा क्लासेस, जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. 
8 )     दि. 29 मार्च 2021 पासून सर्व सार्वजनिक ठिकाणे  अर्थात बगीचे, उद्याने आदी  सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहतील. याचे उल्लंघन करणा-या प्रत्येक व्यक्तीस   1000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. 
9 ) मास्कचा वापर बंधनकारक आहेच .
सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान नागरिकांनी तोंडावर मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने 27 मार्च 2921 रोजी दिलेल्या  मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीही व्यक्ती मास्क वापरत नसल्याचे दिसून आल्यास त्या व्यक्तीस  500 रुपये इतका दंड आणि  कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळून आल्यास त्या व्यक्तीस  1000 रुपये  इतका दंड आकारण्यात येईल.
10 )     जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल्स, लॉन्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

11 ) जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. दैनंदिन बाजारांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन आणि  गर्दीचे नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने संबंधित नगर परिषद , नगर पालिका , नगर पंचायत यांनी पर्यायी व्यवस्था करावयाची आहे .  आवश्यकतेनुसार वॉर्डनिहाय दैनंदिन बाजारांची जागा निश्चित करुन द्यावयाची आहे .
12 ) फुड कोर्ट्स , रेस्टॉरंट्स , उपहारगृहे , बार यांनी करावयाच्या कार्यवाहीत  जिल्ह्यातील सर्व फुड कोर्ट्स , रेस्टॉरंट्स , उपहारगृहे ,अल्पोपहार केंद्र या संज्ञेमध्ये येणा-या आस्थापनांमध्ये ज्या आस्थापना नगर परिषद , नगर पालिका , नगर पंचायत यांच्या हद्दीमध्ये किंवा हद्दीबाहेर तसेच राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गांलगत असल्या तरीही  फक्त स्वयंपायकगृह चालू ठेवून अन्न पदार्थाची घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत परवानगी राहील. ग्राहकांना फुड कोर्ट्स , रेस्टॉरंट्स , उपहारगृह , अल्पोपहार केंद्रामध्ये बसून अन्नपदार्थ खाण्याची परवानगी असणार नाही. बारमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत केवळ पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी राहील.
13 ) चित्रपटगृहे, कलाकेंद्रे, मनोरंजन केंद्रे, मॉल्स, सभागृहे यांनी करावयाच्या कार्यवाहीत  दि. 29 मार्च 2021 पासून सर्व एक पडदा आणि मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, कलाकेंद्रे, मनोरंजन केंद्रे, मॉल्स, सभागृहे सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेमध्ये  बंद राहतील. चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स याठिकाणी केंद्र आणि  महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या   आदेशांमध्ये नमूद प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोविड-19 या आजारास आपत्ती म्हणून अधिसूचित ठेवले जाईल त्या कालावधीपर्यंत संबंधित चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद करण्यात येतील. तसेच अशा प्रकारचे उल्लंघन करणा-या संबंधित आस्थापनांचे मालक आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडास पात्र राहतील. 


14 ) मेळावे , सभा , संमेलने यांना मनाई असणार आहे . त्यामुळे कोणतेही सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , धार्मिक मेळावे , सभा , संमेलने यांना परवानगी असणार नाही. सभागृहे  आणि नाट्यगृहे यांचाही सदर मेळावे , सभा , संमेलने आयोजित करण्यासाठी वापर करता येणार नाही. अशा प्रकारचे उल्लंघन करणा-या संबंधित आस्थापनांचे मालक आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडास पात्र राहतील. तसेच केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोविड-19 या आजारास आपत्ती म्हणून अधिसूचित ठेवले जाईल त्या कालावधीपर्यंत संबंधित आस्थापना व त्यांची साधनसामुग्री बंद करण्यात येतील. 
15 )     विवाह समारंभांस 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. याचे उल्लंघन करणा-या संबंधित व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडास पात्र राहतील.

16 ) अंत्ययात्रांमध्ये 20 पेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होण्याची परवानगी असणार नाही. या अनुषंगाने संबंधित स्थानिक शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावयाची आहे .
17 ) रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW):-  उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नगर परिषद , नगर पालिका , नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत सायंकाळी 7 ते पहाटे 5 या कालावधीत रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW) राहील. या कालावधीत सर्व अत्यावश्यक बाबी  यात आरोग्य विषयक सुविधा, प्रवासी वाहतूक  वगळून व्यक्तींच्या हालचालींना कडक प्रतिबंध राहील.  
18 ) गृह विलगीकरण (Home Isolation): कोविड-19 चा संसर्ग झालेल्या  आणि  शासकीय कोविड केअर सेंटर (CCC) मध्ये दाखल असलेल्या रुग्णास शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या  परवानगीशिवाय गृह विलगीकरणामध्ये जाण्याची परवानगी असणार नाही. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गृह विलगीकरणाची परवानगी दिली असल्यास त्याची लेखी माहिती संबंधित तालुक्यातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांना देणे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांवर बंधनकारक राहील. गृह विलगीकरणाच्या बाबतीत उपचार करणा-या वैद्यकीय व्यावसायिकाची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल. रुग्णाच्या गृह विलगीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी यांचेव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीची शिफारस अनुज्ञेय असणार नाही.  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (न.प./न.पा./न.पं./जि.प./पं.स./ग्रा.पं.) यांनी कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर 14 दिवसांसाठी तसा सूचनाफलक किंवा स्टीकर लावावे. 


19 ) शासकीय , निमशासकीय ,  खासगी आस्थापनांत (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) 50 टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील. तर शासकीय आणि  निमशासकीय कार्यालयातील विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थितीनुसार कर्मचारी संख्या निश्चित करतील. उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरु ठेवू शकते. तथापि , उत्पादनक्षेत्राच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या अनुषंगाने कामगारांच्या संख्येचे  नियमन करण्यात यावे. तसेच उत्पादन क्षेत्रामध्ये मास्कचा वापर, व्यक्तींची नियमित तपासणी (तापमान, ऑक्सीजन पातळी), सॅनिटायजरचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आदी  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. याचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित उत्पादन संस्था केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोविड-19 या आजारास आपत्ती म्हणून अधिसूचित ठेवले जाईल त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच अशा प्रकारचे उल्लंघन करणा-या संबंधित आस्थापनांचे मालक आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडास पात्र राहतील.
20 )    शासकीय कार्यालयांमधील गर्दी कमी करण्यासाठी निर्वाचित लोकप्रतिनिधी वगळून इतर अभ्यागत नागरिकांना अगदी तातडीच्या कामासाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. ज्या अभ्यागत नागरिकांना बैठका  आदी  कामांसाठी निमंत्रित केले असेल त्यांना विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पहावे. 
21.    धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे यांच्या व्यवस्थापनांनी करावयाच्या  कार्यवाहीत     जिल्ह्यातील सर्व मंदिरे , धार्मिक स्थळे , प्रार्थनास्थळे सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीतच सुरु राहतील. 
 जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे , मंदिरे पुढील आदेशापर्यंत दर रविवारी बंद राहतील. धार्मिक विधींमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. तसेच धार्मिक स्थळे तसेच प्रार्थनास्थळे या ठिकाणी “नो मास्क नो एन्ट्री” या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे याठिकाणी गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी संबंधित धार्मिक स्थळ , प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनांवर राहील. त्याअनुषंगाने संबंधित धार्मिक स्थळ , प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनांनी सामाजिक अंतराच्या निकषांनुसार किती व्यक्तींना एका वेळी प्रवेश देता येऊ शकतो याचा विचार करुन दर तासाला कमाल किती भाविकांना धार्मिक स्थळ , प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश देण्यात येईल हे निश्चित करावे. 


    भाविकांना प्रवेशासाठी ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे याठिकाणी मास्कचा वापर, व्यक्तींची नियमित तपासणी (तापमान, ऑक्सीजन पातळी), सॅनिटायजरचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आदी  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. हे पालन होण्यासाठी संबंधित धार्मिक स्थळ, प्रार्थनास्थळ यांच्या व्यवस्थापनांनी आवश्यक ते मनुष्यबळ नियुक्त करावे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे  आदेश क्र. 2020/उपचिटणीस/एमएजी/सीआर-26 दि. 15 नोव्हेंबर 2020 चे परिशिष्ट – अ मध्ये देण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे काटेकोरपणे पालन करावे.
22 ) श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी  श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे  दररोज फक्त 5000 भाविकांना प्रवेश द्यावा .  तसेच मंदिर सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेतच चालू राहील , याची दक्षता घ्यावी .
23)  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्बंधांसह चालू राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रवाशांच्या अनुज्ञेय संख्येइतकेच प्रवाशी असणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन आढळून आल्यास संबंधित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या व्यवस्थापनास  500 रुपये  इतका दंड आकारण्यात येईल. 


24 ) जिल्हाधिकारी  कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
25 )या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (जि.प./पं.स./ ग्रा.पं./न.प./न.पा./न.पं.), Incident Commander, संबंधित शासकीय विभाग , यंत्रणा यांचेवर राहील. शहरी भागात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, वसूली अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणारी कोविड-19 प्रतिबंधक वॉर्ड दक्षता समिती स्थापन करावी. या समितीने त्या प्रभागात कोविड-19 च्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे याकडे लक्ष ठेवावे. ग्रामीण भागात सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व जि. प. शिक्षकांचा समावेश असणारी ग्रामस्तरीय कोविड-19 प्रतिबंधक दक्षता समिती स्थापन करावी. या समितीने गावात कोविड-19 च्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे याकडे लक्ष ठेवावे.
26 ) या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय , कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 29 मार्च 2021 रोजी रात्री 12.00 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे असेही या आदेशात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या आदेशात म्हटले आहे .

From around the web