उमरग्यातील डाॅ.शेंडगे यांच्यासह लॅबचालक बनसोडेंवर गुन्हा दाखल
उमरगा - उमरगा शहरातील शेंडगे हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरचे डॉ. आर. डी. शेंडगे यांच्यासह तानाजी बनसोडे यांच्याविरूद्ध मंगळवारी (ता.१२) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजाराच्या तपासणीचे बनावट कागदपत्र तयार करून संबंधित पॉलिसी कंपनीची तसेच रुग्णांची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही डॉ. शेंडगे यांच्यावर अनेक गुन्हेदाखल आहेत.
शहरातील शेंडगे रिसर्च सेंटरमधील लॅबचालक तानाजी बबुवान बनसोडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली होती. २०१५ पासून सहा सप्टेंबर २०१९ पर्यंत हॉस्पीटलमध्ये बनावट कागदपत्र तयार करून आपली फसवणूक केल्याची त्यांची तक्रार होती. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. यु. सुर्यवंशी वैद्यकिय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लोहारा, डॉ. सीमा बळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय लोहारा, डॉ.रोचकरी वैद्यकिय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय , तुळजापुर यांची डॉ. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त चौकशी समिती स्थापन केली. या समितीने चौकशी पूर्ण करून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अहवाल सादर केला होता.
त्यात म्हटले आहे की, या प्रकरणाच्या संबंधाने तक्रारदार श्री. बनसोडे, गैरअर्जदार डॉ. शेंडगे यांच्याकडे चौकशी करून व कागदपत्रांची पडताळणी केली असता डॉ. शेंडगे दोषी असुन त्यांनी तक्रारदार श्री. बनसोडे यांची फसवणूक केल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदार श्री. बनसोडे यांनी दिलेल्या जबाबावरून डॉ. शेंडगे यांनी सांगितल्याप्रमाणे यापुर्वी रुग्णांचे कमी, जास्त प्रमाणात अहवाल देण्यासाठी त्यांना मदत केल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात दोघे दोषी आहेत असा अभिप्राय चौकशी समितीने दिला होता. हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला गेला. त्यानंतर दरम्यान या प्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमधील सदस्यांपैकी एका सदस्यास प्राधिकृत करून चौकशी अहवालाचे मुळ कागदपत्रासह तक्रार देण्यासाठी प्राधिकृत करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र दिले होते.
परंतु समितीतील सदस्यानी तक्रार दाखल केलेली नसल्यामुळे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या सूचनेनुसार उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे यांनी चौकशी समितीमधील सदस्यांनी केलेल्या चौकशी प्रमाणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे की, डॉ. शेंडगे यांनी तानाजी बनसोडे हे आजारी नसताना त्यांचे कागदपत्र आयपीडी पेपर, एक्स - रे , इ.सी.जी. व रक्ताच्या तपासण्याचे रिपोर्ट बनावट तयार करून संबंधिताचे पॉलिसी कंपनीकडुन बील उचलुन अपहार केली तसेच २०१५ पासुन सहा सप्टेंबर २०१९ पर्यंत रुग्णाचे नाव व कोडवर्डच्या खुणा करून श्री. बनसोडे याच्या मदतीने हवे तसे चुकीचे रक्ताचे रिपोर्ट तयार करून घेऊन रुग्णांची फसवणुक केल्या प्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.