दाऊतपूर ग्रामपंचायतीचे दोन शिवसेना सदस्य अपात्र
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या दोन शिवसेना सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले असून, निवडणूक स्वयंघोषणा पत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये झाली होती. त्यात ९ पैकी ७ सदस्य शिवसेनेचे तर २ सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. पैकी शिवसेनेचे दोन सदस्य प्रवीण मारुती बनसोडे व पल्लवी प्रशांत थोरात यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र म्हणून घोषित केले आहे, तसेच निवडणूक स्वयंघोषणा पत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
शिवसेनेचे सदस्य प्रवीण मारुती बनसोडे व पल्लवी प्रशांत थोरात यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण घर बांधल्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला असता, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिवसेनेचे सदस्य प्रवीण मारुती बनसोडे व पल्लवी प्रशांत थोरात यांना गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरणी अपात्र करून निवडणूक स्वयंघोषणा पत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशानंतर गटविकास अधिकारी यांनी दाऊतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकास गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे लवकरच प्रवीण मारुती बनसोडे आणि पल्लवी प्रशांत थोरात यांच्या विरुद्ध ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे.