ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मागण्यांची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा
 
s

उस्मानाबाद - महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन ओळखपत्रे द्यावीत यासह विविध मागण्यांसाठी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, समाज कल्याण आयुक्त, साखर आयुक्त यांना तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.27) निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची शासनस्तरावर नोंदणी नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे व पाल्यांचे जीवन हलाखीचे झाले आहे. ऊसतोड कामगार हे शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांचे जीवन उंचावले नाही.  महााराष्ट्रातील 300 पेक्षा जास्त कार्यान्वित कारखान्यांच्या गळीत हंगामामध्ये सुमारे 14 ते 15 लाख मजूर कार्यरत आहेत. काही मजूर महाराष्ट्राबाहेर जाऊनही ऊसतोडीचे काम करत आहेत. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी शासन निर्णयानुसार राज्यातील 41 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 100 क्षमतेचे प्रत्येकी एक असे एकुण 82 श्री संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह देण्यात आलेली आहेत.

परंतु उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जालना, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, नाशिक यासारख्या ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी शासकीय वसतिगृह देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरील ठिकाणी वसतिगृहांची सोय करावी, समान काम समान वेतन योजना लागू करावी, ऊसतोड कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, ऊसतोड कामगारांना कारखाना स्तरावर रेशन उपलब्ध करुन द्यावे, ऊसतोड कामगारांना अत्यावश्यक किट आणि संरक्षण किट द्यावे, ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक तरतूद करावी, ऊसतोड मजुरांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करावे, घरकुल मिळवून द्यावे, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना  उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई, नागपूर लातूर अशा ठिकाणी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह उपलब्ध करुन द्यावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष बाबु राठोड,जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, अ‍ॅड. राजुदास आडे, कैलास राठोड, अ‍ॅड. शरद राठोड, विलास राठोड, दिलीप आडे, अ‍ॅड. अनिल राठोड, अ‍ॅड. अजित सपकाळ आदींची स्वाक्षरी आहे.


 

From around the web