ठाकरे सेनेमुळे फुलवाडी टोलनाक्यावर टोल वसुली तीन दिवसापासून बंद 

 जोपर्यंत कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल नाही - खा.  ओमप्रकाश राजेनिंबाळकर
 
tol

उस्मानाबाद :  सोलापूर - उमरगा या राष्ट्रीय महामागार्वरील फुलवाडी आणि तलमोड टोलनाका  शिवसैनिकांनी ( उद्धव ठाकरे  गट ) केलेल्या आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. जोपर्यंत या राष्ट्रीय महामागार्वरील काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहन चालकांनी टोल देऊ नये, जर टोल वसुली सुरु झाली तर हाणून पाडावी, असे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे. 

सोलापूर - उमरगा या राष्ट्रीय महामागार्वरील  अणदूर उड्डाण पूल, नळदुर्ग बायपास रोड, जळकोट उड्डाण पूल आदी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तसेच या रस्त्यावरील अनेक कामे अपूर्ण आहेत.   या महामार्गाच्या अपुर्ण कामाच्या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रकल्प संचालक, एस.टी.पी.एल. तसेच जिल्हाधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करुन राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करण्याच्या अनुषंगाने दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. 

सदरील महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघातात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असुन सदरील महामार्ग 2016 मध्ये एस.टी.पी.एल. कंपनीने महामार्गाचे काम पुर्ण करणे अपेक्षित असतानासुध्दा आजपर्यंत सदरील महामार्ग पुर्ण केला नाही त्यामुळे दि. 01 जानेवारी 2023 पासून सदर महामार्गावरील फुलवाडी टोल प्लाझा व तलमोड टोल प्लाझा येथील टोल वसुली बंद करण्यात आली होती. त्या पार्श्वभुमीची दखल घेवुन तात्काळ जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती ती बैठक संपल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार हे स्वत:हुन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या भेटीला आले व त्यांनी आम्ही कामे चालू करतो आम्हाला 7 दिवसांची मुदत द्या व आम्हाला टोलनाके चालु करु द्या अशी विनंती केली त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर उपस्थित होते. 

            यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरुन “2016 पासुन 2022 पर्यंत तुम्ही काय झोपले होता का ?” असा सवाल उपस्थित करत इतक्या दिवसात जे नागरिक अपघातांमध्ये मयत झाले याला जबाबदार कोण राहणार, आणखीन किती दिवस अशीच नागरिक अपघातामध्ये मृत्यु होण्याची वाट बघत बसणार अशा कडक भाषेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 

आता आमची सहनशिलता संपलेली असून टोलनाके सुरु करणेसंदर्भात कोणीही विनंती केली तरी मी कोणाचेही ऐकणार नसून मी सर्वसामान्यांच्या मृत्युची तडजोड कसल्याही बाबतीत करणार नाही. सदरील मार्गावरील अपुर्ण कामे स्वत: पाहणी करुन चालू झाल्याची खात्री करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची टोल वसुली होवू देणार नाही अशा स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले व आपण ज्या क्षणी सदरील मार्गावरील कामे सुरु झाल्याचे कळवताच या ठिकाणी स्वत: पाहणी करेन व बंद केलेले टोल नाके चालु करण्याची परवाणगी देईन असे सुनावले एकुणच खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा संताप व राग पाहुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व कंत्राटदार यांनी याबाबत अखेरीस सहमती दाखवली व 2 ते 3 दिवसात सहमती दाखवू व त्यानंतरच टोल वसुली करु असे कबुल केले.

            त्यामुळे प्रवाशांना व वाहन मालकांना विनंती आहे की, या दोन टोल नाक्यावर कोणत्याही प्रकारचा टोल देवू नये तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी सदरील टोल नाक्यावर टोल वसुली होत असल्यास टोल वसुली बंद पाडावी असे आवाहन देखील खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दी माध्यमांद्वारे केले. आहे. 

From around the web